Share Market Today : भारतीय शेअर बाजाराने २०२५ या वर्षाचा निरोप अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात घेतला आहे. वर्षाच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदी केल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीने दमदार तेजी नोंदवली. मुंबई शेअर बाजाराचानिर्देशांक सेन्सेक्स ५४५ अंकांनी वधारून ८५,२२० वर, तर निफ्टी १९० अंकांच्या वाढीसह २६,१२९ च्या स्तरावर बंद झाला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत आज एकाच दिवसात सुमारे ४ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.
गुंतवणूकदारांना वर्षाअखेरची 'लॉटरी'
शेअर बाजारातील या तेजीमुळे बीएसईमधील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४७१.७२ लाख कोटींवरून वाढून ४७५.७० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच, सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांनी सुमारे ३.९८ लाख कोटी रुपये कमावले आहेत.
तेजीची प्रमुख कारणे
- सेफगार्ड ड्युटीचा आधार : केंद्र सरकारने स्टील आयातीवर 'सेफगार्ड ड्युटी' लावल्याच्या बातमीमुळे स्टील आणि मेटल कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी झाली.
- कच्च्या तेलात घसरण : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला.
- व्हॅल्यू बाइंग : गेल्या काही दिवसांच्या घसरणीनंतर अनेक दर्जेदार शेअर्स स्वस्त झाल्याने गुंतवणूकदारांनी खालच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात खरेदी केली.
क्षेत्रीय कामगिरी : मेटल आणि ऊर्जा शेअर्स चमकले
आयटी आणि टेलिकॉम वगळता आज सर्वच क्षेत्रीय निर्देशांकांत तेजी होती. ऑईल अँड गॅस, एनर्जी आणि मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी दिसून आली. तसेच पीएसयू बँक, ऑटो आणि कंझ्युमर ड्युरेबल्सचे निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक वाढले.
आजचे 'टॉप गेनर्स' आणि 'लूजर्स'
सेन्सेक्समधील तेजीचे शेअर्स
- टाटा स्टील : २.४५% (सर्वात मोठी वाढ)
- कोटक महिंद्रा बँक : २.१७%
- रिलायन्स इंडस्ट्रीज : २.१०%
- ॲक्सिस बँक : १.९४%
- टायटन : १.८१%
सेन्सेक्समधील घसरणीचे शेअर्स
- टीसीएस : २.१०% (सर्वात मोठी घसरण)
- टेक महिंद्रा : १.३७%
- इन्फोसिस : १.१२%
- बजाज फायनान्स : ०.९५%
- सन फार्मा : ०.८४%
