Share Market : शेअर बाजारात गेल्या दोन दिवसांपासून मोठी घसरण सुरू आहे. आज(मंगळवार) सेन्सेक्स आणि निफ्टी सुमारे दीड टक्क्यांनी घसरले. त्यामुळे देशातील टॉप 10 कंपन्यांच्या मार्केट कॅप 2.37 लाख कोटी रुपयांनी घसरले. यामध्ये भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकेला मोठा तोटा झाला आहे.
सेन्सेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, सोमवारी 1100 हून अधिक अंकांची घसरण दिसून आली. तर, गेल्या दोन दिवसांत 1500 हून अधिक अंकांची घसरण दिसून आली आहे. दुसरीकडे, गेल्या दोन दिवसांत निफ्टीमध्ये 464.85 अंकांची घसरण दिसून आली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे 4.59 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
देशातील टॉप 10 कंपन्यांची स्थिती
- देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS चे मार्केट कॅप दोन दिवसांत 56,243.17 कोटी रुपयांनी कमी झाले. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 16,18,587.63 कोटी रुपयांवरून 15,62,344.46 कोटी रुपयांवर आले.
- देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप दोन दिवसांत 41,612.05 कोटी रुपयांनी कमी झाले. कंपनीचे मार्केट कॅप 17,23,144.70 कोटी रुपयांवरून 16,81,532.65 कोटी रुपयांवर आले.
- टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलचे मार्केट कॅप 40,860.43 कोटी रुपयांनी कमी झाले.
- देशातील सर्वात मोठी खाजगी बँक HDFC च्या मार्केट कॅपला दोन दिवसांत 30,579.49 कोटी रुपयांचा तोटा झाला.
- इन्फोसिसच्या मार्केट कॅपला दोन दिवसांत 16,961.94 कोटी रुपयांचा तोटा झाला.
- देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी कर्ज देणारी ICICI बँकेच्या मार्केट कॅपला दोन दिवसांत 13,090.17 कोटी रुपयांचा तोटा झाला.
- देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI च्या मार्केट कॅपला दोन दिवसात 12,985.33 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
- देशातील सर्वात मोठ्या FMCG कंपन्यांपैकी एक असलेल्या ITC च्या मार्केट कॅपला दोन दिवसांत 8,757.57 कोटी रुपयांचा तोटा झाला.
- देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरच्या मार्केट कॅपला दोन दिवसांत 8,024.15 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
- देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी LIC च्या मार्केट कॅपला दोन दिवसांत 7,811.38 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
- अशाप्रकारे गेल्या दोन दिवसांत देशातील टॉप 10 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 2,36,925.68 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.
शेअर बाजार मंगळवारी इतका घसरला
मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 1064.12 अंकांच्या घसरणीसह 80,684.45 अंकांवर बंद झाला. तर ट्रेडिंग सत्रादरम्यान सेन्सेक्स 1,136.37 अंकांनी घसरुन दिवसाच्या खालच्या स्तरावर 80,612.20 अंकांवर पोहोचला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक निफ्टी 332.25 अंकांच्या घसरणीसह 24,336.00 अंकांवर बंद झाला.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)