Share Market Rise : सकाळच्या सत्रात इराण-अमेरिका युद्धाच्या सावटाखाली कोसळलेल्या भारतीय शेअर बाजाराने दुपारनंतर मात्र फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. जागतिक स्तरावर युद्धविरामाच्या सकारात्मक बातम्या आणि बँकिंग-आयटी क्षेत्रातील जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीनेगुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला. एका वेळी ६०० अंकांनी ढासळलेला सेन्सेक्स व्यवहार बंद होताना तब्बल ७८७ अंकांनी वधारला.
बाजारची आजची स्थिती
- BSE सेन्सेक्स : ७४,१०६.८५ (+७८७.३० अंक | १.०७% वाढ)
- NSE निफ्टी : २२,९६८.२५ (+२५५.१५ अंक | १.१२% वाढ)
- मिडकॅप आणि स्मॉलकॅप : दोन्ही निर्देशांकात १ टक्क्यांहून अधिक तेजी नोंदवण्यात आली.
बाजारात तेजी येण्याची 'ही' ४ मुख्य कारणे
१. अमेरिका-इराण युद्धविरामाची आशा
रॉयटर्सच्या हवाल्याने मिळालेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानने मध्यस्थी करून अमेरिका आणि इराणसाठी एक 'शांतता आराखडा' तयार केला आहे. या प्रस्तावांतर्गत तातडीने युद्धविराम करून 'होर्मुजची सामुद्रधुनी' व्यापारासाठी पुन्हा खुली केली जाऊ शकते. या सकारात्मक बातमीमुळे जागतिक बाजारासह भारतीय गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
२. रुपयाची 'मजबूत' कामगिरी
रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत ३३ पैशांची झेप घेतली. रुपया आता ९२.८५ च्या पातळीवर पोहोचला आहे. रुपया मजबूत झाल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारावरील विश्वास वाढला.
३. बँकिंग शेअर्समध्ये 'धुंवाधार' खरेदी
बँकिंग क्षेत्रातील शेअर्सनी आज बाजाराला सावरण्यात मोठी भूमिका बजावली. मार्च तिमाहीचे बिझनेस अपडेट्स सकारात्मक आल्याने बँक शेअर्समध्ये २ टक्क्यांपर्यंत तेजी दिसली:
बँक ऑफ महाराष्ट्र : ४.२% वाढ
बँक ऑफ इंडिया : ४.१% वाढ
बँक ऑफ बडोदा : ३.५% वाढ
४. आयटी क्षेत्राची साथ
मुलभूत कारणांमुळे आयटी कंपन्यांचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले लागतील, या आशेने गुंतवणूकदारांनी टीसीएस, इन्फोसिस यांसारख्या शेअर्समध्ये खरेदी केली. निफ्टी आयटी इंडेक्समध्ये आज १ टक्क्याची वाढ झाली.
वाचा - सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
