Share Market Rise : भारतीय शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी तेजीचे वर्चस्व पाहायला मिळाले. परदेशी गुंतवणूकदारांची घरवापसी आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने आज मोठी उसळी घेतली. सत्राच्या अखेरीस सेंसेक्स ६३८.४५ अंकांच्या (०.७५%) वाढीसह ८५,५६७ वर, तर निफ्टी २०६.४० अंकांच्या (०.७९%) वाढीसह २६,१७२ वर बंद झाला.
बाजाराच्या उसळीमागील ६ प्रमुख कारणे
परदेशी गुंतवणूकदारांची घरवापसी
सलग १४ दिवसांच्या विक्रीच्या सत्रानंतर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदी सुरू केली आहे. गेल्या तीन सत्रांत त्यांनी सुमारे ३,७७६ कोटी रुपयांची खरेदी केल्याने बाजारातील 'सेंटीमेंट' सुधारले आहे.
२. अमेरिकन 'फेड'कडून दिलासा
२०२६ मध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात दोनदा कपात करेल, अशी अपेक्षा गुंतवणूकदारांना आहे. अमेरिकेत व्याजदर कमी झाल्यास भारतात परदेशी गुंतवणूक वाढण्याची दाट शक्यता असते.
३. आयटी क्षेत्राची 'पॉवर'
जागतिक आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'ॲक्सेंचर'च्या चांगल्या निकालांमुळे भारतीय आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी झाली. इन्फोसिस आणि विप्रो यांसारखे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत वधारले.
४. रुपयाची मजबुती
विदेशी गुंतवणुकीच्या ओघामुळे भारतीय रुपया आज २२ पैशांनी वधारून ८९.४५ प्रति डॉलर वर पोहोचला. रुपया वधारल्याने आयात शुल्क कमी होऊन महागाई नियंत्रणात येण्यास मदत होते.
५. जागतिक बाजारात 'हिरवळ'
जपानचा निक्केई, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे सर्व आशियाई बाजार आज हिरव्या निशाणात बंद झाले. यामुळे स्थानिक गुंतवणूकदारांचा उत्साह द्विगुणित झाला.
६. आरबीआयच्या 'मिनिट्स'चा आधार
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तातून भविष्यात व्याजदर कपातीची शक्यता अधोरेखित झाली आहे. हे बाजारासाठी बूस्टर ठरले.
वाचा - ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
निफ्टीचे पुढचे लक्ष्य काय?
जियोजित इन्व्हेस्टमेंट्सचे आनंद जेम्स यांच्या मते, निफ्टीने गेल्या आठवड्याचा नीचांक पार करून वरच्या पातळीवर टिकून राहण्यात यश मिळवले आहे. जर निफ्टी २५,९८० च्या वर टिकून राहिला, तर लवकरच तो २६,३०० च्या नव्या लक्ष्याकडे कूच करेल. मात्र, यात अपयश आल्यास बाजार काही काळ एकाच रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे.
