Share Market Down : भारतीय शेअर बाजारात आज, मंगळवार, २ डिसेंबर रोजी सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. विदेशी गुंतवणूकदारांची जोरदार विक्री, रुपयाचे कमजोर होणे आणि बँकिंग शेअर्समध्ये झालेली नफावसुली यामुळे गुंतवणूकदारांचे सेंटिमेंट कमकुवत झाले आणि बाजारात दबाव दिसून आला. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्स सुमारे ६०० अंकांनी तुटला, तर निफ्टी १७० हून अधिक अंकांनी खाली येत २६,००० च्या महत्त्वाच्या स्तराखाली गेला.
बाजारातील घसरणीमागील ४ प्रमुख कारणे
१. रुपयाची ऐतिहासिक कमजोरी
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आज ८९.७० वर उघडला आणि व्यवहारादरम्यान ८९.९२ च्या विक्रमी नीचांकी स्तरावर पोहोचला. क्रूड ऑइलच्या वाढलेल्या किंमती आणि विदेशी गुंतवणूकदारांची विक्री यामुळे रुपया कमजोर झाला.
२. विदेशी गुंतवणूकदारांची सातत्यपूर्ण विक्री
विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी १,१७१ कोटी रुपयांची मोठी विक्री केली. सलग तिसऱ्या दिवशी विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढले आहेत. मार्केट तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदार आता उच्च स्तरावर धोका पत्करणे टाळत आहेत.
३. जागतिक बाजारातून कमजोर संकेत
जागतिक बाजारांमध्येही आज कमजोर संकेत दिसून आले. आशियाई बाजारांमधील शांघाई कंपोजिटसारखे प्रमुख निर्देशांक लाल निशाणीवर होते. तसेच, अमेरिकेचे शेअर बाजारही सोमवारी घसरणीसह बंद झाले होते.
४. बँकिंग शेअर्समध्ये मोठी घसरण
निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स व्यवहारादरम्यान सुमारे ०.४% पर्यंत तुटला. HDFC बँक आणि ICICI बँक या बँकिंग क्षेत्रातील दिग्गजांना सर्वाधिक नुकसान झाले.
निफ्टी बँक इंडेक्सच्या वेटेजमध्ये झालेल्या बदलामुळे बँकिंग शेअर्समध्ये ही घसरण दिसून आली. सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, इंडेक्समधील टॉप-३ शेअर्सचे कमाल वेटेज आता अनुक्रमे १९%, १४% आणि १०% करण्यात आले आहे.
टेक्निकल चार्ट्स काय सांगतात?
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स यांच्या मते, बाजारात सध्या दबावाची स्थिती आहे. जर निफ्टी २६,११० ते २६,०६० च्या दरम्यान परतण्यात यशस्वी झाला, तर तेजी पुन्हा येऊ शकते.
मात्र, जर हा स्तर तुटला, तर निफ्टी २५,८६०–२५,७०० पर्यंत घसरण्याची शक्यता वाढेल.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
