Share Market Rise : गुरुवारच्या ऐतिहासिक 'ब्लॅक थर्सडे'नंतर, शुक्रवारी २० मार्च रोजी भारतीय शेअर बाजाराने फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेतली. मध्य आशियातील युद्धाचे ढग विरळ होण्याचे संकेत आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी घट, यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारात जोरदार पुनरागमन केले. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने १,००० अंकांची उसळी घेतली, तर निफ्टीने २३,००० चा महत्त्वाचा मानसिक स्तर पुन्हा सर केला.
बाजारातील आजच्या तेजीची 'सहा' मुख्य कारणे
- कच्च्या तेलाच्या किमतीत नरमाई : काल ११९ डॉलर प्रति बॅरलवर गेलेले 'ब्रेंट क्रूड' आज १०७ डॉलरपर्यंत खाली आले आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी "इराणच्या तेल आणि गॅस ठिकाणांवर आता हल्ले होणार नाहीत आणि युद्ध लवकर संपू शकते," असे संकेत दिल्याने जागतिक बाजाराला मोठा दिलासा मिळाला.
- खालच्या स्तरावर 'व्हॅल्यू बाइंग' : गुरुवारी बाजार ३ टक्क्यांहून अधिक पडल्याने अनेक दर्जेदार शेअर्स स्वस्त झाले होते. निफ्टीसाठी २३,००० हा स्तर तांत्रिकदृष्ट्या भक्कम आधार मानला जात होता. याच स्तरावरून गुंतवणूकदारांनी स्वस्त भावात शेअर्स खरेदी करण्यास सुरुवात केली.
- सकारात्मक जागतिक संकेत : आशियाई बाजारात आज उत्साहाचे वातावरण होते. दक्षिण कोरियाचा 'कोस्पी' आणि चीनचा 'शांघाय' बाजार नफ्यात व्यवहार करत होते. अमेरिकन बाजारही खालच्या स्तरावरून सावरल्याचा फायदा भारतीय बाजाराला झाला.
- युद्धविरामाची आशा : "जमिनीवर सैन्य पाठवण्याची सध्या तरी योजना नाही," या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विधानाने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. तणाव कमी झाल्याने बाजाराला ही संजीवनी मिळाली आहे.
- इंडिया VIX मध्ये घट : बाजारातील भीती मोजणारा 'इंडिया VIX' निर्देशांक ३ टक्क्यांनी घसरून २२.१४ वर आला. याचा अर्थ असा की, बाजारातील अस्थिरता आता कमी होत असून गुंतवणूकदारांमधील भीतीची लाट ओसरू लागली आहे.
- दिग्गज शेअर्सचा आधार : रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या दिग्गज कंपनीच्या शेअरमध्ये ३ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीला मोठा आधार मिळाला.
सकाळच्या सत्रातील स्थिती
| निर्देशांक | सद्यस्थिती | वाढ (अंक/%) |
| BSE सेन्सेक्स | ७५,२३४.२६ | + १,०२७.०२ (१.३८%) |
| NSE निफ्टी | २३,३३६.८० | + ३३४.६५ (१.४५%) |
सेक्टरनिहाय कामगिरी : निफ्टीचे सर्व १६ सेक्टोरल इंडेक्स 'हिरव्या' निशाणात व्यवहार करत होते. मिडकॅप १०० मध्ये १.५% तर स्मॉलकॅप १०० मध्ये ०.८% ची वाढ दिसून आली.
वाचा - ९३ पार! रुपयाच्या घसरणीने आरबीआयच्या चिंतेत भर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे अर्थव्यवस्था धोक्यात?
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
