Share Market : भारतीय शेअर बाजारातील नकारात्मक कल बुधवारीही कायम राहिला. सलग तिसऱ्या सत्रात घसरण नोंदवत प्रमुख निर्देशांक लाल निशाण्यावर बंद झाले. जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि बड्या बँकांच्या शेअर्समधील नफावसुलीमुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसून आले. यापूर्वी सोमवारी आणि मंगळवारीही बाजारात मोठी पडझड झाली होती. विशेषतः मंगळवारी सेन्सेक्स ५३३ अंकांनी तर निफ्टी १६७ अंकांनी कोसळला होता, त्या तुलनेत आजची घसरण मर्यादित राहिली.
सेंसेक्समधील ३० कंपन्यांचा कल
आज बाजार बंद होताना सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये समसमान विभागणी पाहायला मिळाली. ३० पैकी १५ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या निशाण्यावर, तर उर्वरित १५ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल निशाण्यावर बंद झाले. निफ्टी ५० मध्येही ५० पैकी २६ कंपन्यांना फटका बसला, तर २४ कंपन्या सावरल्या.
आजचे टॉप गेनर्स
बँकिंग क्षेत्रातील दिग्गज स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर आज १.५१ टक्क्यांच्या वाढीसह सेन्सेक्समध्ये अव्वल स्थानी राहिला. इतर वधारलेले शेअर्समध्ये इन्फोसिस (०.५७%), सन फार्मा (०.५१%), एक्सिस बँक (०.४१%), मारुती सुझुकी (०.३६%), टीसीएस (०.३५%), टाटा स्टील (०.२४%) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (०.२१%).
आजचे टॉप लूजर्स
आज सर्वात मोठी घसरण ट्रेंटच्या शेअरमध्ये १.६४% इतकी नोंदवली गेली. इतर घसरलेले शेअर्समध्ये एचडीएफसी बँक (०.९९%), अदानी पोर्ट्स (०.८९%), आयसीआयसीआय बँक (०.८८%), बजाज फिनसर्व्ह (०.६७%), बीईएल (०.५३%) आणि टायटन (०.४९%).
वाचा - कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
गुंतवणूकदारांची चिंता वाढली
बँकिंग क्षेत्रातील वजनदार समजल्या जाणाऱ्या एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेतील घसरणीमुळे निर्देशांकावर दबाव राहिला. मात्र, आयटी क्षेत्रातील इन्फोसिस आणि टीसीएस सारख्या कंपन्यांनी काही प्रमाणात आधार देण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीन दिवसांतील सलग घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत मोठी घट झाली असून, बाजार आता महत्त्वाच्या आधार पातळीवर पोहोचला आहे.
