Sensex-Nifty Closes Red : शेअर बाजारात आज 'ब्लॅक ट्युजडे'चा थरार पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रात जोरदार सलामी देणाऱ्या बाजारात दुपारी अचानक मोठी विक्री झाल्याने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली. इंट्रा-डे हायवरून सेन्सेक्स ९९५ अंकांनी कोसळला, तर निफ्टीनेही २५,६०० ची पातळी गाठली होती. मकर संक्रांतीच्या सुटीमुळे बदललेली एक्सपायरी आणि जागतिक संकेत यामुळे बाजारात आज प्रचंड अस्थिरता दिसून आली.
दिवसभराचा 'हाहाकार' आणि रिकव्हरी
सकाळी बाजार तेजीत उघडला होता, मात्र नफावसुलीमुळे विक्रीचा दबाव वाढला. दिवसाच्या ८४,२५८ या उच्चांकावरून सेन्सेक्स ८३,२६२ पर्यंत खाली आला. अखेर तो २५०.४८ अंकांच्या (०.३०%) घसरणीसह ८३,६२७.६९ वर बंद झाला. तर निफ्टी ५० देखील ५७.९५ अंकांनी (०.२२%) घसरून २५,७३२.३० वर स्थिरावला.
गुंतवणूकदारांना १.१० लाख कोटींचा फटका
बाजारातील या पडझडीचा थेट परिणाम गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर झाला आहे. १२ जानेवारी रोजी बीएसईवरील कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ४,६८,७३,४३९ कोटी रुपये होते. आज (१३ जानेवारी) हे मार्केट कॅप ४,६७,६२,७३२ कोटींवर खाली आले. म्हणजेच एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १,१०,७०६.८९ कोटी रुपये स्वाहा झाले आहेत.
सेंसेक्समधील 'टॉप गेनर्स' आणि 'लूसर्स'
सेंसेक्समधील ३० पैकी केवळ १० शेअर्स हिरव्या निशाण्यात बंद झाले, तर २० शेअर्समध्ये घसरण झाली. एटर्नल, आयसीआयसीआय बँक आणि टेक महिंद्रा यांनी बाजाराला सावरण्याचा प्रयत्न केला. तर ट्रेंट आणि एल अँड टी या शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली.
बाजारातील इतर ठळक घडामोडी
बीएसईवर आज एकूण ४,३२७ शेअर्समध्ये व्यवहार झाले. यामध्ये १६५ शेअर्सनी अप्पर सर्किट गाठले, तर १८२ शेअर्समध्ये लोअर सर्किट लागले. तसेच ६९ शेअर्सनी वर्षभरातील सर्वोच्च स्तर गाठला, तर २३२ शेअर्स वर्षभरातील निच्चांकी स्तरावर आले.
वाचा - तुमच्या कुटुंबाचे भविष्य करा सुरक्षित! वर्षाला फक्त २० रुपये भरा आणि मिळवा २ लाखांचे कवच
अस्थिरतेचे मुख्य कारण काय?
१५ जानेवारी रोजी मकर संक्रांतीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे. यामुळे शुक्रवारऐवजी गुरुवारी होणारी सेन्सेक्सची विकली एक्सपायरी एक दिवस आधी म्हणजेच उद्या (बुधवार, १४ जानेवारी) होणार आहे. आज निफ्टीची एक्सपायरी आणि उद्याची सेन्सेक्स एक्सपायरी या दोन चक्रात अडकल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात 'शॉर्ट कव्हरिंग' आणि 'प्रॉफिट बुकिंग' पाहायला मिळाली.
