Stock Market : भारतीय शेअर बाजारात आज, सोमवारी, दिवसभर मोठी अस्थिरता दिसून आली. कामकाजाची सुरुवात सकारात्मक झाली असली तरी, दुपारनंतर गुंतवणूकदारांनी जोरदार नफावसुली केल्याने बाजारात मोठी पडझड झाली. सकाळच्या तेजीनंतर दुपारी झालेल्या विक्रीमुळे प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले.
सेन्सेक्स-निफ्टीची स्थिती
आज सेन्सेक्स ३३१.२१ अंकांनी (०.३८%) घसरून ८४,९००.७१ च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी ५० इंडेक्समध्ये १२७ अंकांची (०.४९%) मोठी घसरण झाली आणि तो २५,९४१.१५ च्या पातळीवर बंद झाला.
आजचे टॉप गेनर्स
सोमवारच्या अस्थिर बाजारातही सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ ५ कंपन्यांचे शेअर हिरव्या निशाणीवर बंद झाले. टेक महिंद्रामध्ये सर्वाधिक २.४३% वाढ नोंदवत टेक महिंद्राचे शेअर्स टॉप गेनर ठरले. इतर शेअरमध्ये एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये ०.४६% आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये ०.२५% ची किंचित वाढ झाली. अदानी पोर्ट ०.१८% आणि सन फार्मा ०.१४% वाढून बंद झाले.
वाचा - डॉलरसमोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; ₹८९.४९ च्या नीचांकी पातळीवर, तुमच्या गुंतवणुकीचं काय होणार?
आजचे टॉप लूजर्स
आजच्या कामकाजात बीईएलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ३.०९% ची मोठी घसरण झाली. महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीचे शेअर १.८९% तुटून बंद झाले. टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये १.६१% ची घसरण झाली. अल्ट्राटेक सिमेंट याचे शेअर १.२२% कोसळले. तर बजाज फिनसर्व्हमध्ये १.१३% ची घसरण नोंदवण्यात आली. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, जागतिक संकेतांपेक्षा देशांतर्गत गुंतवणूकदारांनी दुपारनंतर केलेल्या नफावसुलीमुळे ही घसरण झाली.
