kalahridhaan trendz : शेअर बाजारातील काही गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस दुष्काळात तेरावा महिना ठरू शकतो. गेल्या वर्षी बाजारात सूचीबद्ध झालेल्या एका कंपनीवर सेबीने मोठी कारवाई केली आहे. कलाहिृधान ट्रेंडजच्या ((Kalahridhaan Trendz Ltd) मार्केटमधील व्यवहारांवर पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे. कंपनीच्या संचालकांवरही अशीच कारवाई करण्यात आली आहे. ही बातमी बाहेर येताच शेअर्स भुईसपाट झाले. या शेअरमध्ये ५ टक्के लोअर सर्किट होऊन भाव १९ रुपयांवर आला आहे.
सेबीने कलाहिृधान ट्रेंडजवर बंदी का घातली?
कापड उत्पादन क्षेत्रातील ही कंपनी २३ फेब्रुवारी २०२४ रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाली होती. सेबीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने थकबाकी भरण्यात चूक झाल्याची माहिती दिली नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. शेअर्सचा भाव वाढवण्यासाठी कंपनीने खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या घोषणा केल्या. यामुळे शेअरवर सकारात्मक परिणाम होऊन त्यांचा भाव वधारला. परिणामी शेअर्सची मागणी वाढली होती. एकप्रकारे कंपनीने गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप कंपनीवर ठेवण्यात आला आहे.
गुंतवणूकदार अडचणीत येणार?
सेबीच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात तात्काळ कारवाई केली नाही तर किरकोळ गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होऊ शकतं. कारण, प्रवर्तकांसाठी १ वर्षाचा लॉक-इन २३ फेब्रुवारी २०२५ च्या आसपास संपत आहे. सेबीच्या नियमांनुसार, लॉक-इन संपल्यानंतर, प्रवर्तक समभागांची विक्री सुरू करू शकतात. जर प्रवर्तकांनी असं केलं तर किरकोळ गुंतवणूकदार या स्टॉकमध्ये अडकू शकतात. सेबीने कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन डी अग्रवाल, संचालक आदित्य अग्रवाल आणि गैर-कार्यकारी संचालक सुनीतादेवी निरंजन अग्रवाल यांच्यावर बंदी घातली आहे.
राइट इश्यूवरही बंदी आणणार?
कंपनीच्या बोर्डाने राइट इश्यूद्वारे निधी उभारण्यासही मान्यता दिली आहे. जर हे थांबवले नाही तर आणखी काही गुंतवणूकदार या शेअरमध्ये अडकू शकतात. त्यामुळे यावरही बंदी घालण्याचा विचार केला जात असल्याचे सेबीने सांगितले आहे.