Scoda Tubes IPO : गुंतवणूकदारांसाठीशेअर बाजारात एक नवीन संधी उपलब्ध झाली आहे! स्कोडा ट्यूब्स (Scoda Tubes) या गुजरातमधील स्टेनलेस स्टील कंपनीचा IPO (Initial Public Offering) आज, २८ मे २०२५ रोजी खुला झाला आहे. हा IPO ३० मे २०२५ रोजी बंद होईल. तुम्ही जर आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर स्कोडा ट्यूब्सच्या या ऑफरबद्दल सविस्तर माहिती घेऊया. हा IPO मेनबोर्ड श्रेणीतील आहे, म्हणजे तो एनएसई (NSE) किंवा बीएसई (BSE) च्या मुख्य प्लॅटफॉर्मवर लिस्ट होईल.
स्कोडा ट्यूब्स IPO ची मूलभूत माहिती:
- प्राइस बँड (Price Band): १३० ते १४० रुपये प्रति शेअर
- लॉट साईज (Lot Size): १०० शेअर्स
- किमान गुंतवणूक: १४,००० रुपये (१०० शेअर्स x १४० रुपये)
- कमाल गुंतवणूक: २,००,००० रुपये
GMP आणि संभाव्य नफा
आज सकाळी (२८ मे) स्कोडा ट्यूब्सचा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) २२ रुपये आहे. या GMP नुसार, गुंतवणूकदारांना यामध्ये १५.७१ टक्के नफा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच, या शेअरची अंदाजित लिस्टिंग किंमत १६२ रुपये (१४० + २२) असू शकते.
तज्ञांचे मत काय आहे?
एंजेल वनचे वरिष्ठ मूलभूत विश्लेषक, वकार जावेद खान यांनी या IPO बद्दल काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या मते, सध्या ग्रे मार्केटमध्ये या IPO चा प्रीमियम १८ रुपये आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना १३ टक्के नफा मिळेल. त्यांनी असेही नमूद केले की, गेल्या दोन वर्षांत कंपनीचा महसूल दुप्पट झाला आहे, ही एक सकारात्मक बाब आहे. मात्र, त्यांनी काही नकारात्मक बाजूही सांगितल्या आहेत. खान यांच्या मते, स्कोडा ट्यूब्स अतिशय स्पर्धात्मक क्षेत्रात काम करते. तसेच, आर्थिक वर्ष २०२२, २०२३ आणि २०२४ साठी कंपनीचा OCF (ऑपरेटिंग कॅश फ्लो) नकारात्मक आहे, जो चांगला संकेत मानला जात नाही.
निधी उभारणीचा उद्देश
स्कोडा ट्यूब्स (Scoda Tubes) या IPO मधून २२० कोटी रुपये निधी उभारण्याची योजना आखत आहे. या निधीचा वापर कंपनी आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी करेल. याशिवाय, मिळालेल्या पैशातून खेळत्या भांडवलाची (Working Capital) गरज आणि कंपनीची इतर सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टे पूर्ण केली जातील.
वाचा - ओला इलेक्ट्रिकला 'शॉक'! एकेकाळी नंबर वन, आता 'टीव्हीएस-बजाज'ने टाकले मागे, 'या' कारणांनी घसरण
स्कोडा ट्यूब्स बद्दल
स्कोडा ट्यूब्स (Scoda Tubes) ही गुजरातमधील एक स्टेनलेस स्टील उत्पादक कंपनी आहे. ते सीमलेस (Seamless) आणि वेल्डेड (Welded) ट्यूब्स आणि पाईप्सचे उत्पादन करतात. त्यांची उत्पादने प्रामुख्याने तेल आणि वायू, रसायन आणि वीज यांसारख्या क्षेत्रांना पुरवली जातात.
टीप - गुंतवणूक करण्यापूर्वी, या आयपीओचे सखोल विश्लेषण करणे आणि तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. आम्ही दिलेली माहिती हा गुंतवणुकीचा सल्ला नाही.