Anil Ambani Company's Stocks: अनिल अंबानी कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी घसरण झाली. कंपनीचे बहुतांश शेअर्सना लोअर सर्किट लागलंय. रिलायन्स पॉवरचा शेअर आज ५ टक्क्यांनी घसरला आणि ५६.७२ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. याशिवाय रिलायन्स इन्फ्राच्या शेअरनेही ५ टक्क्यांची नीचांकी पातळी गाठली आणि इंट्राडे नीचांकी स्तर ३४२.०५ रुपयांवर घसरला. रिलायन्स होम फायनान्सच्या शेअरनंबी ५ टक्क्यांची नीचांकी पातळी गाठली आणि हा शेअर ४.४९ रुपयांपर्यंत घसरला.
का झाली घसरण?
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवरील कथित तीन हजार कोटी रुपयांच्या कर्जाच्या घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या तपासासंदर्भात सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी अनेक ठिकाणी छापे टाकले. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. या कंपन्यांनी घेतलेल्या इतर काही बँक कर्जांव्यतिरिक्त काही कथित अघोषित परकीय मालमत्ताही एजन्सीच्या चौकशीच्या कक्षेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुबंईतील ३५ पेक्षा अधिक ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. हे प्रकरम ५० कंपन्या आणि सुमारे २५ लोकांशी संबंधित आहेत. या छाप्यात काही कागदपत्रे आणि कम्प्युटर उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. ईडीच्या दिल्ली स्थित तपास पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. यानंतर अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या
प्रकरण काय?
रिलायन्स अनिल अंबानी ग्रुप कंपनीने केलेल्या कथित मनी लॉड्रिंगप्रकरणी हे छापे टाकण्यात आले. अंबानींच्या समूह कंपन्यांनी मनी लॉड्रिंग केल्याबाबत नॅशनल हाऊसिंग बँक, सेबी, नॅशनल फायनॅन्शियल रिपोर्टिंग ऑथोरिटी, बँक ऑफ बडोदा यांच्याकडील माहिती, सीबीआयकडून दाखल दोन एफआयआरच्या माहितीच्या आधारे ईडीनं हे छापे टाकले.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १३ जून रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाने अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन यांना घोटाळेबाज जाहीर केले. याप्रकरणी आता बँक सीबीआयकडे औपचारिक तक्रार दाखल करणार आहे. बँकेनं कंपनीला २,२२७ कोटी ६४ लाख रुपयांचे कर्ज दिलं आहे. मात्र, या कर्जाची मुद्दल आणि व्याज २६ ऑगस्ट २०१६ पासून थकीत आहे.
येस बँकेकडून घेतलेल्या कर्जाचीही तपासणी
अंबानी यांच्या उद्योग समूहानं येस बँकेकडून २०१७ ते २०१९ या कालावधीत तीन हजार कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र, या कर्जासाठी लाचखोरी झाली, तसेच कर्जाची रक्कम काही बनावट कंपन्यांच्या माध्यमातून वळवत अफरातफर करण्यात आल्याचा ठपका ईडीनं ठेवला आहे.
रिलायन्स म्हणते...
हे छापे जुन्या प्रकरणांशी निगडीत आहे. आमच्या कंपन्यांशी याचा संबंध नाही. कोणतीही चौकशी देखील सुरू नाही, अलं रिलायन्स पॉवर व इन्फ्रास्ट्रक्चर या दोन कंपन्यांनी म्हटलंय.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)