Mukesh Ambani Reliance IPO: रिलायन्स इंडस्ट्रीजनं (Reliance Industries) आपल्या रिटेल कंपनीला शेअर बाजारात आणण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीने २०२८ पर्यंत आपली रिटेल युनिट रिलायन्स रिटेलचा (Reliance Retail) आयपीओ आणण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.
यासाठी रिलायन्स आपल्या रिटेल युनिटमध्ये नफा देणाऱ्या विस्तारावर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनी दरवर्षी अंदाजे २००० नवीन स्टोअर्स उघडण्याची योजना आखत आहे आणि त्याचसोबत आपलं कर्जही कमी करत आहे. कंपनीचं मूल्यांकन वाढवणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. रिलायन्स रिटेल वेगानं वाढत असलेल्या क्विक कॉमर्स सेगमेंटमध्ये आपला हिस्सा वाढवू इच्छिते. यासाठी कंपनी मोठ्या शहरांमध्ये अधिकाधिक 'डार्क स्टोअर्स' उघडण्यावर भर देत आहे.
कर्ज मोठ्या प्रमाणात कमी केले
ईटीच्या एका अहवालानुसार, देशातील सर्वात मोठ्या रिटेलर कंपनीनं आयपीओच्या तयारीसाठी आपली बॅलन्सशिट सुधारण्यास सुरुवात केली आहे. रिलायन्स रिटेलचे बिगर-चालू कर्ज (Non-Current Borrowing) वित्त वर्ष २०२५ मध्ये कमी होऊन ₹२०,४६४ कोटी झाले आहे, जे मागील वित्तीय वर्षात ₹५३,५४६ कोटी होते. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, यापैकी रिलेटेड पार्टी लोन वित्त वर्ष २०२५ मध्ये घटून ₹५,६५५ कोटी झाले आहे, जे FY२०२४ मध्ये ₹४०,१६४ कोटी होते. उर्वरित कर्ज बँकांकडून घेतलेले आहे. रिलायन्स रिटेलने याबद्दल त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
तोटा करणारी स्टोअर्स बंद
या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्यानं सांगितले की, स्टोअर्सचा विस्तार विचारपूर्वक केला जाईल जेणेकरून नेटवर्क नफ्यात राहील आणि कंपनीचे मूल्यांकन वाढेल. ते म्हणाले की, सध्या रिलायन्स आपल्या टेलिकॉम व्यवसायाच्या आयपीओवर लक्ष केंद्रित करत आहे, जी पुढील वर्षी (२०२६) नियोजित आहे. त्यानंतर दोन वर्षांनी रिटेल व्यवसायाचा आयपीओ येईल. मागील दोन वित्त वर्षात तोटा देणारे स्टोअर्स बंद करण्याचे मोठं काम आता पूर्ण झालं आहे. स्टोअर्स बंद करणं सुरूच राहील, परंतु ते सामान्य व्यावसायिक कामकाजाचा भाग असेल. स्टोअर्स बंद होत असतानाही, निव्वळ स्वरूपात दरवर्षी २००० नवीन स्टोअर्स जोडले जातील.
नेटवर्क नफ्यात ठेवण्यावर भर
रिलायन्स रिटेलच्या नवीन योजनांवरून हे दिसून येतं की, कंपनी आता वेगाने स्टोअर उघडण्याची गती कायम ठेवणार नाही. २०२२ आणि २०२३ मध्ये मोठ्या संख्येने स्टोअर्स उघडली गेली होती, परंतु FY२४ आणि FY२५ मध्ये तोटा देणारे स्टोअर्स बंद करण्यात आले. सप्टेंबर तिमाहीपर्यंत कंपनीचे देशभरात १९,८२१ आउटलेट्स होते. या तिमाहीत ४१२ स्टोअर्स उघडण्यात आले. या तिमाहीत रिटेल व्यवसायाच्या एकूण महसुलात मागील वर्षाच्या तुलनेत १८% वाढ झाली असून तो ₹९०,०१८ कोटी झाला. तर, करानंतरचा नफा १७% वाढून ₹३,४३९ कोटी झाला.
दररोज १० लाख ऑर्डर्स
अधिकाऱ्यानं हे देखील सांगितले की, रिलायन्स रिटेल भविष्यात क्विक कॉमर्सवरही बारकाईनं लक्ष ठेवेल. कंपनी सध्या दररोज १० लाख ऑर्डर्स पूर्ण करत आहे, त्यापैकी ९०% ऑर्डर्स ३० मिनिटांपेक्षा कमी वेळेत डिलिव्हर होतात. या उपक्रमासाठी कंपनी मोठ्या शहरांमध्ये आपले स्मार्ट पॉईंट ग्रोसरी स्टोअर्स 'डार्क स्टोअर'मध्ये रूपांतरित करत आहे.आयपीओच्या तयारीचा भाग म्हणून रिलायन्स समूहाने रिलायन्स रिटेलचा एफएमसीजी (FMCG) व्यवसाय थेट मूळ कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी बनवला आहे.
