Reliance Investors Earning: शेअर बाजारासाठी मागील आठवडा बऱ्याच चढ-उतारांनी भरलेला होता. सेन्सेक्स-निफ्टीमधील प्रचंड चढउतारांमुळे सेन्सेक्सच्या टॉप-१० कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या सहा कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. यामुळे त्यांचे बाजार भांडवल एकत्रितपणे ७०००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमी झाले. पण, अशा वातावरणातही ४ कंपन्यांनी दमदार कामगिरी केली. यात देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आघाडीवर होती.
६ कंपन्यांना ७०००० कोटी रुपयांचा फटका
गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील चढउतारानंतर, बीएसई सेन्सेक्स अखेर ६२६.०१ अंकांनी म्हणजेच ०.७४ टक्क्यांनी घसरला. या काळात, सेन्सेक्सच्या टॉप सहा कंपन्यांचे बाजार मूल्य ७०,३२५.५० कोटी रुपयांनी कमी झाले. ज्या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला त्यात एचडीएफसी बँक, टीसीएस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एलआयसी आणि बजाज फायनान्स यांचा समावेश आहे. दुसरीकडे, रिलायन्स, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि एसबीआयच्या गुंतवणूकदारांनी भरपूर पैसे छापले.
रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजचे गुंतवणूकदार गेल्या आठवड्यात कमाईच्या बाबतीत आघाडीवर होते. फक्त पाच दिवसांच्या व्यवहारात १५,३५९.३६ कोटी रुपये कमावले, तर रिलायन्सचे मार्केट कॅपही २०,६६,९४९.८७ कोटी रुपयांपर्यंत वाढले. इतर कंपन्यांमध्ये इन्फोसिसने पाच दिवसांत ₹१३,१२७.५१ कोटींची कमाई केली. त्या पाठोपाठ, हिंदूस्तान युनिलिव्हर ₹७,९०६.३६ आणि एसबीआय ₹५,७५६.३८ चमा समावेश आहे.
या बँकांना फटका
आता गेल्या आठवड्यात खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेचे बाजारमूल्य १९,२८४.८० कोटी रुपयांनी घसरुन १५,२५,३३९.७२ कोटी रुपयांवर आले. याशिवाय, आयसीआयसीआय बँक मार्केट कॅपदेखील १३,५६६.९२ कोटी रुपयांनी कमी होऊन १०,२९,४७०.५७ कोटी रुपयांवर आले.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला घ्या.)