Reliance Home Finance Limited Share: अनिल अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये सातत्यानं मोठी वाढ दिसून येत आहे. आज मंगळवारी कंपनीच्या शेअर्सनी पुन्हा एकदा १०% चं अपर सर्किट गाठलं. सोमवारीही हा शेअर १०% पर्यंत वाढला होता. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडचे शेअर्स आज १०% वाढून ४.४० रुपयांवर पोहोचले. त्याची मागील बंद किंमत ४ रुपये होती. गेल्या पाच दिवसांत या शेअरमध्ये ३५% वाढ झाली आहे. शेअर्समध्ये ही वाढ होण्याचं कारण मार्च तिमाहीचे निकाल आहेत. अलीकडेच कंपनीनं जानेवारी ते मार्च या तिमाहीचे निकाल जाहीर केले. दीर्घकाळात हा स्टॉक ९६% ने घसरलाय.
कंपनीच्या शेअर्सची स्थिती
रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडचा शेअर २२ सप्टेंबर २०१७ रोजी १०७ रुपयांवर होता. म्हणजेच सध्याच्या किमतीनुसार हा शेअर आतापर्यंत ९६ टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांत हा शेअर ९३ टक्के आणि यंदा आतापर्यंत १२ टक्क्यांनी वधारलाय. कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत ५.८० रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत २.१५ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप २१३.२१ कोटी रुपये आहे.
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, चांदीच्या दरात मोठा बदल; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट दर
मार्च तिमाही निकाल
रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडला मार्च तिमाहीत ६८.८ लाख रुपयांचा निव्वळ तोटा झालाय. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा तोटा ६७४.९ लाख होता. म्हणजेच कंपनीचा तोटा कमी झाला आहे. हे मोठ्या सुधारणेचं लक्षण आहे. कंपनीनं वर्षभरात आपला तोटा जवळपास ९० टक्क्यांनी कमी केलाय. २०१८-१९ या संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीचा निव्वळ तोटा २४.१७ कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षी याच कालावधीत ३.५५ कोटी रुपये होता.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)