D Mart Q2 Update : देशातील सर्वात मोठ्या सुपरमार्केट साखळ्यांपैकी एक असलेल्या आणि राधाकिशन दमानी यांच्या मालकीच्या ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीचे उत्कृष्ट निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने महसुलात जोरदार वाढ नोंदवली आहे. शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने हे तिमाही निकाल जाहीर केल्यामुळे, सोमवारी (६ ऑक्टोबर) कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या टार्गेटमध्ये राहण्याची शक्यता आहे.
महसुलात १५.४३% वार्षिक वाढ
३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने *१६,२१८.७९ कोटी रुपयांचा स्टँडअलोन महसूल मिळवला आहे.
वार्षिक वाढ : गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील १४,०५०.३२ कोटी रुपयांच्या महसुलापेक्षा ही वाढ १५.४३ टक्के अधिक आहे.
तिमाही वाढ : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील १५,९३२.१२ कोटी रुपयांच्या तुलनेत यात १.८ टक्केची वाढ झाली आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२५ पर्यंत देशभरात डी-मार्टचे एकूण ४३२ स्टोअर्स कार्यरत आहेत. यामध्ये नवी मुंबईतील सानपाडा येथील आउटलेटचा समावेश आहे, जे सध्या पुनर्बांधणीच्या कामामुळे तात्पुरते बंद आहे.
DMart चे लक्ष आता उत्तर भारतावर
- ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेलर्समधील वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी DMart ने आपल्या विस्ताराची रणनीती बदलली आहे.
- उत्तर प्रदेशवर फोकस: कंपनी आता उत्तर भारतावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ॲव्हेन्यू सुपरमार्ट्सने देशभरात १४ नवीन स्टोअर्स उघडली आहेत, ज्यात उत्तर प्रदेशातील आग्रा येथील प्रमुख स्टोअरचा समावेश आहे.
- विस्ताराची योजना : कंपनीला उत्तर प्रदेशात मोठ्या संधी दिसत आहेत, कारण ती आता पश्चिम आणि दक्षिण भारतातील पारंपरिक बाजारपेठेपलीकडे आपला विस्तार करू इच्छिते. चालू आर्थिक वर्षात एकूण ५० नवीन स्टोअर्स उघडण्याची कंपनीची योजना आहे.
- नेतृत्व बदल: कंपनीच्या विस्तार योजनांमध्ये बदल होत असताना, नेतृत्वातही बदल होणार आहेत. सध्याचे सीईओ आणि एमडी नेविल नोरोन्हा जानेवारी २०२६ मध्ये सेवानिवृत्त होतील. त्यांच्या जागी अंशुल असावा पदभार स्वीकारतील.
वाचा - ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
- पुढील बैठक : कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे, ज्यात दुसऱ्या तिमाहीच्या निकालांवर आणि पुढील धोरणांवर विचार केला जाईल.