Elon Musk : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेत आल्यानंतर टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांचे वजन भलतचं वाढलं आहे. मस्क यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्यासाठी जोरदार प्रचार केला. त्यासाठी पाण्यासारखा पैसाही ओतला. ट्रम्प निवडून येताच मस्क यांना सरकारमध्ये मंत्रिपदाचं बक्षिस मिळालं. इलॉन मस्क यांची टेस्ला लवकरच भारतीय रस्त्यांवरही धावताना पाहायला मिळेल. अशा परिस्थितीत अमेरिकन नागरिकांनी मात्र इलॉन मस्क यांचा विरोध सुरू केला आहे. एकाच दिवसात ५० ठिकाणी आंदोलने करण्यात आली. टेस्ला शोरुमच्या बाहेरील ही आंदोलने जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. मात्र, लोक मस्क यांच्या विरोधात आंदोलन का करत आहेत?
इलॉन मस्कविरोधात आंदोलन का?
डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी खर्च कमी करण्याची जबाबदारी इलॉन मस्क यांच्यावर सोपावली आहे. या पार्श्वभूमीवर इलॉन मस्क यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात अमेरिकन लोक आता रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. उदारमतवादी गट टेस्ला शोरुमच्या बाहेर जवळपास आठवड्यापासून निषेध करत आहेत. टेस्लाच्या विक्रीवर याचा नकारात्मक प्रभाव पडावा, असा आंदोलनकर्त्यांचा उद्देश आहे. तर दुसरीकडे मस्कच्या धोरणाचा निषेध करणे आणि यातून डेमोक्रॅटिक पक्षाला ऊर्जा देण्याचंही बोललं जात आहे.
आंदोलनाची धार वाढणार?
शनिवारी बोस्टनमध्ये निषेध करणारे ५८ वर्षीय मॅसॅच्युसेट्स पर्यावरणशास्त्रज्ञ नॅथन फिलिप्स म्हणाले की आम्ही इलॉन मस्कला धडा शिकवणार आहोत. आम्ही सर्वत्र शोरूमबाहेर आंदोलन करुन टेस्लावर बहिष्कार टाकून कंपनीचे थेट आर्थिक नुकसान करू शकतो. फेडरल खर्च आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यासाठी मस्क ट्रम्पच्या इशाऱ्यावर नाचत आहे. यापुढे ही आंदोलने आणखी वाढण्याची शक्यता आहे.
शेअर्स किती घसरले?
ट्रम्प यांच्या विजयानंतर टेस्ला कंपनीचे शेअर्समध्ये मोठी वाढ झाली होती. मात्र, आता यात घसरण पाहायला मिळत आहे. जगातील सर्वात मोठ्या ईव्ही कंपन्यांपैकी एक असलेल्या टेस्लाच्या शेअर्समध्ये आपल्याला घसरण दिसू शकते. आकडेवारीनुसार, टेस्लाच्या शेअर्समध्ये चालू वर्षात सुमारे 23 टक्के घट झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या मार्केट कॅपलाही फटका बसला आहे. तज्ज्ञांच्या मते, टेस्लाच्या विक्रीत घट झाल्यामुळे टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे. आता या विरोधाचा टेस्लाच्या विक्रीवर किती परिणाम होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.