Piccadily Agro Share price: बाजारातील मंदीदरम्यान पिकाडिली इंडस्ट्रीज या स्मॉल कॅप ब्रुअरी कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. व्यवहारादरम्यान या शेअरनं ५ टक्क्यांची नीचांकी पातळी गाठली आणि भाव ७८४.३५ रुपयांवर आला. वास्तविक, कंपनीनं डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर ४५ टक्क्यांनी घट झाली. ही कंपनी इंद्री सिंगल माल्ट व्हिस्कीची उत्पादक आहे.
तिमाही निकाल कसा लागला?
पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीजनं ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे निकाल ५ फेब्रुवारी रोजी जाहीर केले. कंपनीचा नफा २४.४९ कोटी रुपये झालाय. गेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील ४४.८९ कोटी रुपयांच्या नफ्याच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे ४५ टक्क्यांनी कमी आहे. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचं कामकाजातून मिळणारे उत्पन्न ७ टक्क्यांनी वाढून २०५.७२ कोटी रुपयांवर पोहोचलंय, जे आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत १९१.९१ कोटी रुपये होतं.
आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत पिकाडिली अॅग्रोचं एकूण उत्पन्न २०८.३२ कोटी रुपये होतं. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील १९१.९९ कोटी रुपयांच्या एकूण उत्पन्नाच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे ८ टक्क्यांनी अधिक आहे. दरम्यान, या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च पाच टक्क्यांनी वाढून १७२.१६ कोटी रुपयांवर पोहोचला. आर्थिक वर्ष २०२५ च्या डिसेंबर तिमाहीत डिस्टिलरी सेगमेंटनं १८३.९१ कोटी रुपयांचा महसूल कमावला.
कंपनीबद्दल अधिक माहिती
पिकॅडिली अॅग्रो इंडस्ट्रीजची स्थापना १९९४ मध्ये झाली. कंपनीचा मुख्य व्यवसाय शुगर आणि डिस्टिलरी विभागात आहे. पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीजच्या डिसेंबरमधील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार प्रवर्तकांकडे ७०.९७ टक्के हिस्सा आहे. तर, पब्लिक शेअरहोल्डिंग २९.०३ टक्के आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)