Physicswallah Listing : कोरोना काळात ऑनलाईन शिकवणीमुळे प्रसिद्ध झालेली 'फिजिक्सवाला' कंपनी आता शेअर बाजारातही उतरली आहे. देशातील श्रीमंतांच्या यादीत सामील असलेले अलख पांडे यांच्या 'फिजिक्सवाला' या एडटेक कंपनीच्या शेअरने आज (सोमवार, १७ नोव्हेंबर) शेअर बाजारात दमदार एन्ट्री केली. फिजिक्सवाला शेअरची लिस्टिंग ग्रे-मार्केटच्या अंदाजेपेक्षाही खूप चांगली झाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांना बंपर फायदा झाला आहे.
अपेक्षेपेक्षा सरस लिस्टिंग
ग्रे-मार्केटमध्ये लिस्टिंगच्या अगदी आधी हा शेअर १२% प्रीमियमवर ट्रेड करत होता. यानुसार तो १२३ रुपयांवर लिस्ट होण्याचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात लिस्टिंग अधिक शानदार झाली. एनएसईओवर फिजिक्सवालाचा शेअर ३३% प्रीमियमसह १४५ रुपयांवर लिस्ट झाला. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर याची एन्ट्री ३१% प्रीमियमसह १४३.१० रुपयांवर झाली.
गुंतवणूकदारांना एका लॉटवर सुमारे ५००० रुपयांचा फायदा
फिजिक्सवालाच्या आयपीओमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांना लिस्टिंगमुळे मोठी कमाई झाली आहे. कंपनीने आयपीओसाठी १३७ शेअर्सचा लॉट साईज निश्चित केला होता. अप्पर प्राईस बँड १०९ रुपयांनुसार, एका लॉटसाठी किमान १४,९३३ रुपयांची गुंतवणूक आवश्यक होती. लिस्टिंगनंतर याच गुंतवणुकीचे मूल्य वाढून १९,८६५ रुपये झाले. म्हणजेच, एका लॉटवर गुंतवणूकदारांना थेट ४,९३२ रुपये इतका नफा मिळाला आहे.
कमाल लॉटवर मोठा फायदा
ज्या गुंतवणूकदारांनी जास्तीत जास्त (१३) लॉटसाठी बोली लावली असेल, त्यांची गुंतवणूक १,९४,१२९ रुपये होती. लिस्टिंगनंतर त्यांच्या गुंतवणुकीवर त्यांना ६४,११६ रुपयांचा मोठा फायदा झाला आहे.
आयपीओची कामगिरी
अलख पांडे यांच्या या कंपनीचा आयपीओ ११ नोव्हेंबर रोजी रिटेल गुंतवणूकदारांसाठी खुला झाला होता आणि १३ नोव्हेंबरपर्यंत त्यात बोली लावता येत होती.
आयपीओचा आकार: एकूण ३,४८० कोटी रुपये होता.
सबस्क्रिप्शन : २.७ पट
रिटेल गुंतवणूकदार : पूर्ण सबस्क्रिप्शन
NII : ४८% सबस्क्रिप्शन मिळाले.
एकंदरीत, फिजिक्सवालाच्या दमदार लिस्टिंगने एडटेक क्षेत्रातील संभाव्यतेवर शिक्कामोर्तब केले असून, आयपीओमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा सकारात्मक आठवड्याचा आरंभ ठरला आहे.
वाचा - रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
