Physicswallah Ltd IPO: देशातील आघाडीची एडटेक सेवा प्रदाता कंपनी फिजिक्सवाला लिमिटेडनं त्यांच्या आगामी ₹३,४८० कोटींच्या आयपीओसाठी (IPO) प्राईज बँड निश्चित केलाय. कंपनीनं गुरुवारी जाहीर केलं की त्यांच्या IPO चा प्राईज बँड ₹१०३ ते ₹१०९ प्रति शेअर असेल. फिजिक्सवाला लिमिटेडच्या IPO च्या घोषणेसह, त्याचे संस्थापक अलख पांडे आणि प्रतीक बूब हे दोघेही अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत. हा तीन दिवसांचा इश्यू ११ नोव्हेंबर रोजी उघडेल आणि १३ नोव्हेंबर रोजी बंद होईल. ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स ₹९ च्या प्रीमियमवर व्यवहार करत आहेत.
'फिजिक्सवाला' (PhysicsWallah) या कंपनीच्या आयपीओमुळे दोन्ही संस्थापक अब्जाधीश बनले आहेत. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, दोन्ही संस्थापक पांडे आणि बूब यांच्याकडे प्रत्येकी १०५.१२ कोटी शेअर्स आहेत, जे कंपनीतील ४०.३१% भागभांडवलाइतके आहेत. अपर प्राइस बँड (Upper Price Band) म्हणजे ₹१०९ प्रति शेअर नुसार, या दोघांच्या वैयक्तिक भागभांडवलाचं मूल्य अंदाजे ₹११,४५८ कोटी (सुमारे १.२९ अब्ज डॉलर्स) होतं.
लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
रिपोर्टनुसार, या शेअर्सची अधिग्रहण किंमत जवळजवळ नगण्य आहे, म्हणजे ते खूप कमी मूल्यावर मिळवलेले होते. मार्च २०२५ मध्ये कंपनीनं आपल्या भागधारकांना ३५:१ प्रमाणात बोनस शेअर्स जारी केले होते. या बोनस जारी करण्यापूर्वी, जून २०२४ पर्यंत दोन्ही संस्थापकांकडे ३ कोटी शेअर्स होते, जे कंपनीतील ५०% भागभांडवलाच्या बरोबरीचे होते. बोनस दिल्यानंतर ही संख्या वाढून १०५.१२ कोटी शेअर्स झाली.
आयपीओची संरचना आणि निधीचा वापर
कंपनीचा हा पब्लिक इश्यू दोन भागांमध्ये विभागलेला आहे. यात ₹३,१०० कोटीचा फ्रेश इश्यू (Fresh Issue) आणि ₹३८० कोटी चा ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट आहे. याचा अर्थ असा आहे की, या इश्यूमधून जमा होणाऱ्या रकमेचा मोठा भाग कंपनीच्या विस्तारासाठी आणि विकासाच्या कामांसाठी वापरला जाईल, तर एक हिस्सा विद्यमान गुंतवणूकदारांनी आपला हिस्सा विकण्याच्या स्वरूपात येईल.
शेअर आरक्षण आणि मूल्यांकन
या आयपीओमध्ये ७५% हिस्सा क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी (QIBs) आरक्षित ठेवण्यात आला आहे, तर १०% हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी असेल. किरकोळ गुंतवणूकदार १३७ शेअर्सच्या एका लॉटसाठी बोली लावू शकतात, म्हणजेच किमान गुंतवणूक सुमारे ₹१४,९३३ असेल. यानंतर गुंतवणूकदार १३७ शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ₹१० प्रति शेअरची सूट देखील जाहीर केली आहे.
प्राइस बँडच्या वरच्या स्तरावर, म्हणजेच ₹१०९ प्रति शेअरवर, फिजिक्सवालाचे इश्यूनंतरचे बाजार भांडवल (Post-Issue Market Capitalization) अंदाजे ₹३१,१६९ कोटी असण्याचा अंदाज आहे. आयपीओनंतर कंपनीच्या प्रवर्तकांचे भागभांडवल ८१.६% वरून ७२.३% पर्यंत कमी होईल.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
