Physics Wallah IPO : जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करुन पैसे कमावण्याची संधी शोधत असाल तर अशी संधी लवकरच येणार आहे. लोकप्रिय एडटेक युनिकॉर्न फिजिक्स वाला कंपनीने आपल्या विस्तार आणि विकास योजनांसाठी आयपीओद्वारे ३८२० कोटी रुपये उभारण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे अपडेटेड कागदपत्रे दाखल केली आहेत. शनिवारी दाखल केलेल्या या दस्तऐवजानुसार, प्रस्तावित आयपीओमध्ये ३१०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील, तर प्रमोटर्सद्वारे ७२० कोटी रुपयांचे शेअर्स 'ऑफर फॉर सेल'च्या माध्यमातून विकले जातील.
कंपनीचे दोन्ही प्रमोटर्स अलख पांडेय आणि प्रतीक बूब हे ओएफएसद्वारे प्रत्येकी ३६०-३६० कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहेत.
निधीचा वापर कुठे केला जाणार?
सध्या दोन्ही प्रमोटर्सकडे कंपनीची प्रत्येकी ४०.३५% हिस्सेदारी आहे. फिजिक्स वालाने जाहीर केले आहे की, नवीन शेअर्समधून मिळालेल्या निधीचा वापर पुढीलप्रमाणे केला जाईल.
- ४६०.५ कोटी रुपये: नवीन ऑफलाइन आणि हायब्रिड सेंटर्स सुरू करण्यासाठी.
- ५४८.३ कोटी रुपये: सध्याच्या सेंटर्सच्या लीजचे पैसे देण्यासाठी.
- २००.१ कोटी रुपये: सर्व्हर आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरसाठी.
- ७१० कोटी रुपये: मार्केटिंगसाठी.
- ४७.२ कोटी रुपये: उपकंपनी 'झायलेम लर्निंग' मध्ये गुंतवणूक करण्यासाठी.
- २६.५ कोटी रुपये: 'उत्कर्ष क्लासेस'मधील अतिरिक्त हिस्सेदारी घेण्यासाठी.
फिजिक्स वाला काय काम करते?
फिजिक्स वाला ही कंपनी जेईई (JEE), नीट (NEET), गेट (GATE) आणि यूपीएससी (UPSC) सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारीचे अभ्यासक्रम देते. त्याचबरोबर, कंपनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म (यूट्यूब, वेबसाइट आणि ॲप), ऑफलाइन केंद्रे आणि हायब्रिड केंद्रांच्या माध्यमातून कौशल्य विकास कार्यक्रमही चालवते.
वाचा - सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)