PDP Shipping & Projects IPO Listing: लॉजिस्टिक्स क्षेत्रातील कंपनी पीडीपी शिपिंग अँड प्रोजेक्ट्सचे शेअर्स मंगळवारी, १८ मार्च रोजी शेअर बाजारात लिस्ट झाले. कंपनीच्या शेअर्सची सुरुवात अतिशय वाईट झाली होती. बीएसई एसएमईवर हा शेअर १०८.२५ रुपयांवर लिस्ट झाला, जो त्याच्या १३५ रुपयांच्या इश्यू प्राइसपेक्षा २० टक्क्यांनी कमी आहे. लिस्टिंगनंतर कंपनीचा शेअर ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटवर पोहोचला आणि इंट्राडेच्या नीचांकी पातळीवर १०२.८५ रुपयांवर घसरला. म्हणजेच गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी जवळपास २५ टक्क्यांचा मोठा झटका बसला.
१० मार्च रोजी आयपीओ खुला
पीडीपी शिपिंग अँड प्रोजेक्ट्सचा एसएमई आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी १० मार्च ते १२ मार्च पर्यंत खुला होता. या दरम्यान तो १.०१ पट सब्सक्राइब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांनी १.८८ पट, तर नॉन इस्टिट्युशनल इनव्हेस्टर्सनं ०.१४ पट सब्सक्राइब केलं. पीडीपी शिपिंग आयपीओची इश्यू प्राईज १३५ रुपये प्रति शेअर होती, ज्यात कंपनी ९.३७ लाख शेअर्सच्या फ्रेश इश्यूद्वारे १२.६५ कोटी रुपये उभारण्याची योजना आखत होती.
गुंतवणूकीसाठी किमान लॉट साइज १,००० होती, रिटेल गुंतवणूकदारांना कमीत कमी १,३५,००० रुपयांची गुंतवणूक करणं आवश्यक होते. एचएनआयसाठी कमीत कमी लॉट साईजची गुंतवणूक २,७०,००० रुपये होती. सन कॅपिटल अॅडव्हायझरी सर्व्हिसेस (प्रायव्हेट) लिमिटेड पीडीपी शिपिंग आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर होते. तर केफिन टेक्नोलॉजीज लिमिटेड याचे इश्यू रजिस्ट्रार होते.
काय करते कंपनी?
पीडीपी प्रोजेक्ट्स अँड शिपिंग लॉजिस्टिक्स आणि ट्रान्सपोर्टेशन उद्योगातील एंड-टू-एंड सोल्यूशन प्रदाता आहे, जी लॉजिस्टिक्स उद्योगात समुद्र आणि हवाई मालवाहतूक, कस्टम क्लिअरन्स आणि व्हॅल्यू अॅडेड सेवा प्रदान करते. समुद्र, हवाई, रस्ते, रेल्वे, किनारपट्टीवरील जहाजं किंवा मल्टी-मॉडेल वाहतुकीद्वारे जगभरातील विविध आकाराच्या, वजनाच्या मालाची वाहतूक देखील ही कंपनी हाताळते. ब्राझील आणि अमेरिका, दक्षिण कोरिया, थायलंड इत्यादी देशांमधील थर्ड पार्टी नेटवर्कद्वारे अवजड अभियांत्रिकी यंत्रसामुग्री, संरक्षण उपकरणं, ऑटोमोबाइल्स आणि पायाभूत सुविधा उत्पादनांमधील विशिष्ट वस्तूंच्या आयात आणि निर्यातीसाठी रसद हाताळण्यावर प्रामुख्यानं त्यांचा प्राथमिक भर आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)