गेल्या काही दिवसांपासून दबावात असलेला ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअरमध्ये शुक्रवारी जबरदस्त तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजारात (BSE) कंपनीचा शेअर १० टक्क्यांनी वधारून ३४.४० रुपयांवर पोहोचला आहे. ओला इलेक्ट्रिकचे फाउंडर आणि प्रमोटर भाविश अग्रवाल यांनी तीन दिवसांत स्टेक सेल पूर्ण केले आहे. भाविश अग्रवाल यांनी 3 दिवसांत 324 कोटी रुपयांचे शेअर विकले आहेत. तसेच, प्रमोटर्सकडून आधी आपले गहाण ठेवलेले शेअर सोडवले आहेत.
यासंदर्भात कंपनीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या वैयक्तिक भागभांडवलातील एका छोट्या हिश्शाची विक्री पूर्ण केली. गेल्या तीन दिवसांत सुमारे ३२४ कोटी रुपयांचे शेअर्स विकून त्यांनी २६० कोटी रुपयांचे प्रवर्तक स्तरावरील कर्ज पूर्णपणे फेडले. या व्यवहारामुळे यापूर्वी गहाण ठेवलेले ३.९३ टक्के शेअर्स आता मुक्त झाले असून, प्रवर्तकांवरील सर्व 'प्लेज' (शेअर्स गहाण ठेवणे) संपुष्टात आले आहे. या प्रक्रियेनंतर आता ओला इलेक्ट्रिकमध्ये प्रवर्तक समूहाची ३४.६ टक्के हिस्सेदारी उरली आहे.
भाविश अग्रवाल यांनी मंगळवार ते गुरुवार या कालावधीत मोठ्या बल्क डील्सद्वारे आपली हिस्सेदारी कमी केली. प्रमोटर लेवलवरील कर्ज संपल्याने गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक मेसेज गेला. यामुळे शुक्रवारी खरेदीचा जोर वाढला. असे असले तरी, ओला इलेक्ट्रिकच्या शेअरची दीर्घकालीन कामगिरी चिंताजनक राहिली आहे.
गेल्या एका वर्षात हा शेअर ६३ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. १९ डिसेंबर २०२४ रोजी ९५.१२ रुपयांवर असलेला हा शेअर आता ३४ रुपयांच्या आसपास आहे. विशेष म्हणजे, ७६ रुपये या आयपीओ (IPO) किमतीच्या तुलनेत हा शेअर जवळपास ५० टक्के खाली आला आहे. महत्वाचे म्हणजे, कर्जमुक्तीच्या या निर्णयाचा कंपनीच्या शेअरला कितपत फायदा होतो, हेही बघण्यासारखे असेल.
