Ola Electric Shares: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्समध्ये आज १६ फेब्रुवारी रोजी मोठी घसरण पाहायला मिळाली. बाजार उघडताच कंपनीचा शेअर सुमारे ६ टक्क्यांनी घसरून २८.८१ रुपयांच्या स्तरावर आला. हा या शेअरचा गेल्या एका वर्षातील सर्वात नीचांकी स्तर म्हणजेच '५२-आठवड्यांचा लो' ठरला आहे. गेल्या एका वर्षात ओला इलेक्ट्रिकचा शेअर ५२ टक्क्यांहून अधिक घसरला. कंपनीनं जाहीर केलेल्या डिसेंबर तिमाहीच्या कमकुवत आर्थिक निकालानंतर ही मोठी घसरण झाली. तसंच, ब्रोकरेज फर्म 'एमके ग्लोबल'नं या शेअरचं रेटिंग कमी केलं असून त्याच्या टार्गेट प्राईजमध्ये ६० टक्क्यांची मोठी कपात केली आहे.
'बाय' ऐवजी आता 'सेल' रेटिंग
एमके ग्लोबलनं यापूर्वी ओला इलेक्ट्रिकच्या शेअरला 'बाय' रेटिंग दिलं होतं, परंतु डिसेंबर तिमाहीच्या निकालानंतर आता ते बदलून थेट 'सेल' असं केलंय. त्याचबरोबर या शेअरचं टार्गेट प्राईज ५० रुपयांवरून कमी करुन २० रुपये करण्यात आलंय. ब्रोकरेजच्या मते, कंपनीची तिसऱ्या तिमाहीतील कामगिरी अत्यंत कमकुवत राहिली असून महसूल अर्ध्यावर आला आहे आणि तोटा अजूनही उच्च पातळीवर कायम आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल वार्षिक ५५ टक्क्यांनी घटला असून तिमाही आधारावरही यात ३२ टक्क्यांची घट झाली आहे. कंपनीला या तिमाहीत ४९० कोटी रुपयांचा तोटा झाला असून ग्रॉस मार्जिनमध्ये मात्र ३४.३ टक्क्यांपर्यंत सुधारणा दिसून आली.
विक्रीत घट आणि बाजारातील हिस्स्याबाबत चिंता
कंपनीच्या वाहनांच्या विक्रीत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. विक्रीचं प्रमाण वार्षिक ६१ टक्क्यांनी आणि तिमाही आधारावर ३८ टक्क्यांनी कमी होऊन सुमारे ३२,००० युनिट्सवर आलंय. ऑटो बिझनेसमधून मिळणारा महसूल ५५ टक्क्यांनी घसरून ४६७ कोटी रुपये झाला आहे. ब्रोकरेजच्या मते, इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्राचा दीर्घकालीन दृष्टीकोन मजबूत असला आणि जीएसटी कपातीनंतर मागणी सुधारत असली, तरी या स्पर्धेत ओला इलेक्ट्रिकचा बाजारातील हिस्सा कमी होत आहे, ही चिंतेची बाब आहे.
खर्चात कपात आणि रोख रकमेचं आव्हान
एमके ग्लोबलनं नमूद केलं की, कंपनी सध्या स्टोअर्सची संख्या कमी करणं आणि खर्च मर्यादित करणं यांसारखी पावलं उचलत आहे. कंपनीनं आपला कार्यात्मक खर्च ४३० कोटी रुपयांवरून दरमहा २५०-३०० कोटी रुपयांपर्यंत कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. मात्र, सुधारणेची ही प्रक्रिया दीर्घकालीन आणि आव्हानात्मक असू शकते, कारण बाजारात प्रस्थापित कंपन्यांचा दबाव वाढत आहे आणि एथर एनर्जीसारख्या कंपन्या वेगाने विस्तार करत आहेत. अहवालानुसार, आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या नऊ महिन्यांत कंपनीवरील निव्वळ कर्ज ६७० कोटी रुपये झाले असून, यापूर्वी कंपनी 'नेट कॅश' स्थितीत होती. जर बॅटरी व्यवसायात धोरणात्मक भागीदारी विकून मोठी रोख रक्कम आली, तरच ते कंपनीसाठी सकारात्मक ठरू शकतं, असं ब्रोकरेजनं म्हटले आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला तोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेण आवश्यक आहे.)
