Ola Electric Share Price: भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी Ola इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. एकेकाळी १५७ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचलेला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, आता अवघ्या २५ रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. म्हणजेच, शेअरने आपल्या उच्चांकावरून तब्बल ८४ टक्क्यांची घसरण नोंदवली आहे.
IPO नंतर सुरुवातीला तेजी, आता मोठी घसरण...
ओला इलेक्ट्रिकने २०२४ मध्ये ७६ रुपयांच्या इश्यू प्राइसवर शेअर बाजारात पदार्पण केले होते. लिस्टिंगनंतर शेअरमध्ये जोरदार तेजी आली आणि काही काळातच तो १५७ रुपयांपर्यंत पोहोचला. मात्र, त्यानंतर सुरू झालेली घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. सध्या हा शेअर केवळ २५ रुपयांच्या आसपास असून, तो इश्यू प्राइसपेक्षा सुमारे ७० टक्के खाली आहे.
गुंतवणूकदारांचे ५७,००० कोटी रुपयांचे नुकसान
शेअरमधील या प्रचंड घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. बाजार भांडवलात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे ५७,००० कोटी रुपये बुडाले आहेत. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत इतकी मोठी घसरण होणे, हे शेअर बाजारातील दुर्मिळ पण धोकादायक उदाहरण मानले जात आहे.
मार्केट शेअरमध्ये मोठी घसरण
एकेकाळी इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये ओला इलेक्ट्रिकचा ८० टक्क्यांहून अधिक मार्केट शेअर होता. मात्र, वाढती स्पर्धा, उत्पादन व सेवा गुणवत्तेवरील तक्रारी आणि ग्राहकांचा कमी होत असलेला विश्वास यामुळे हा वाटा आता सुमारे ५ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
नियामक अडचणी आणि शोरूम बंद...
ओलावर दबाव केवळ स्पर्धेमुळेच नाही, तर नियामक अनुपालनाच्या मुद्द्यांमुळेही वाढला आहे. काही ओला इलेक्ट्रिक शोरूम आणि सर्व्हिस सेंटर्स आवश्यक वैध व्यापार परवाने नसताना सुरू असल्याचे आढळून आले होते. यानंतर सरकारने अशा केंद्रांना बंद करण्याचे आदेश दिले होते, ज्याचा थेट परिणाम कंपनीच्या प्रतिमेवर आणि विक्रीवर झाला.
प्रमोटर्सची हिस्सेदारी कमी
कंपनीच्या शेअर्सवरील दबाव वाढण्यामागे प्रमोटर्सकडून हिस्सेदारी विक्री हेही एक मोठे कारण ठरले आहे. कंपनीचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनीही आपली हिस्सेदारी लक्षणीय प्रमाणात कमी केली आहे. यामुळे बाजारात नकारात्मक संदेश गेला आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास आणखी ढासळला.
ब्रोकरेज फर्म्सकडून रेटिंगमध्ये कपात
अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत ब्रोकरेज फर्म्सनी ओला इलेक्ट्रिकच्या शेअरवरील रेटिंग कमी केली आहे. गोल्डमन सॅक्सने तर या शेअरचा टार्गेट प्राइस थेट ५२ रुपयांवरून २६ रुपयांपर्यंत खाली आणला आहे. यामुळे शेअरवर विक्रीचा दबाव आणखी वाढला आहे.
गुंतवणूकदारांसाठी धडा
ओला इलेक्ट्रिकचा हा प्रवास IPO नंतर केवळ तेजी पाहून गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठा इशारा मानला जात आहे. मजबूत ब्रँड, आकर्षक कथा आणि भविष्यातील आश्वासनांपलीकडे जाऊन कंपनीची आर्थिक स्थिती, स्पर्धात्मक क्षमता आणि व्यवस्थापन निर्णय यांचा विचार करणे किती महत्त्वाचे आहे, हे या प्रकरणातून स्पष्ट होते.
(विशेष सूचना- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)
