Ola Electric share price: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्समध्ये २६ डिसेंबर रोजी ५ टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली. सरकारने पीएलआय-ऑटो (PLI-Auto) योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष २०२५ साठी क्लेम केलेल्या ३६६.७८ कोटी रुपयांच्या प्रोत्साहन रकमेच्या देयकाला मंजुरी दिल्याचं कंपनीनं जाहीर केलं आहे. या बातमीनंतर कंपनीचा शेअर ३७.२५ रुपयांवर पोहोचला असून सलग दुसऱ्या सत्रात या शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे.
पीएलआई प्रोत्साहनाची मंजुरी आणि प्रक्रिया
२५ डिसेंबर रोजी एक्सचेंज फायलिंगद्वारे माहिती देताना ओला इलेक्ट्रिकनं सांगितलं की, ही मंजुरी आर्थिक वर्ष २०२५ च्या निर्धारित विक्री मूल्यासाठीच्या मागणी प्रोत्साहनाशी संबंधित आहे. कंपनीला गुरुवारी अवजड उद्योग मंत्रालयाकडून आयएफसीआय लिमिटेड (IFCI Limited) मार्फत प्रोत्साहन रक्कम जारी करण्याचे मंजुरी पत्र मिळालं. हे प्रोत्साहन पीएलआय-ऑटो योजनेच्या लागू नियम आणि अटींनुसार मंजूर करण्यात आलं असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.
तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
ओला इलेक्ट्रिकची अधिकृत भूमिका
कंपनीनं आपल्या निवेदनात म्हटलंय की, हा टप्पा भारताच्या प्रगत ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टममधील ओला इलेक्ट्रिकची प्रमुख भूमिका अधिक मजबूत करतो. तसंच हे कंपनीची मोठ्या प्रमाणावरील उत्पादन क्षमता, स्थानिकीकरण आणि तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक उत्पादनातील मजबूत अंमलबजावणी क्षमता दर्शवते. ओला इलेक्ट्रिकच्या प्रवक्त्यांनी या घडामोडीवर भाष्य करताना सांगितलं की, ३६६.७८ कोटी रुपयांची ही मंजुरी कंपनीच्या उत्पादन क्षमतेचं आणि भारतातील जागतिक दर्जाच्या ईव्ही तंत्रज्ञान निर्मितीच्या प्रयत्नांचं समर्थन आहे. हे प्रोत्साहन देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी मूल्य साखळीत नाविन्यपूर्ण बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचीदेखील दखल घेणारं आहे.
शेअरचा इतिहास आणि बाजारपेठेतील स्थिती
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये गेल्या पाच दिवसांत १० टक्क्यांची वाढ झाली असली तरी, गेल्या एका महिन्यात तो १० टक्क्यांहून अधिक घसरला होता. गेल्या सहा महिन्यांत हा शेअर १५ टक्क्यांनी आणि गेल्या एका वर्षात ६१ टक्क्यांनी घसरला आहे. विशेष म्हणजे, २०२५ या वर्षात आतापर्यंत हा शेअर सुमारे ५८ टक्क्यांनी खाली आलाय. याउलट, प्रतिस्पर्धी कंपनी एथर एनर्जीचा शेअर ६ मे रोजी लिस्टिंग झाल्यापासून १३८ टक्क्यांनी वधारला आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
