Share Market Investment: भारतीय शेअर बाजारात गेल्या काही काळापासून चढ-उतार सुरू आहेत. सप्टेंबर तिमाहीपासून बाजारात झालेल्या घसरणीमुळे छोट्या गुंतवणूकदारांची चिंता वाढली असली, तरी अनुभवी गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओवरही त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. सचिन बन्सल, विजय केडिया आणि हितेश दोशी यांसारख्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये सप्टेंबर तिमाहीपासून ३० ते ३२ टक्क्यांची घसरण झालीये. भारतीय बाजार, सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांमध्ये सप्टेंबरअखेर १२ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातील घसरण आणखी तीव्र असून त्यात २० टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली.
Primeinfobase.com आकडेवारीनुसार या घसरणीचा परिणाम इतर दिग्गज गुंतवणूकदारांवरही दिसून आलाय. हेमेंद्र कोठारी यांच्या पोर्टफोलिओमध्ये २९ टक्के, डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांच्या पोर्टफोलिओत २८ टक्के आणि विश्वास पटेल यांच्या पोर्टफोलिओत २७ टक्क्यांची घसरण झाली. तर दुसरीकडे अनिल गोयल आणि अनुज शेठ यांच्या पोर्टफोलिओत २४ टक्के, तर राजेश कुमार आणि भाविक त्रिपाठी यांच्या पोर्टफोलिओत २३ टक्क्यांची घसरण झाली आहे.
मात्र, काही गुंतवणूकदार असे आहेत ज्यांनी बाजारात घसरण असूनही आपला पोर्टफोलिओ मजबूत ठेवलाय. सप्टेंबर तिमाहीपासून मनीष जैन यांच्या पोर्टफोलिओमध्ये जवळपास ३३ टक्के वाढ झाली. नोव्हेंबरमध्ये एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्सच्या आयपीओमध्ये त्यांचा हिस्सा होता. राकेश झुनझुनवाला परिवार आणि संजीव शहा यांनीही ही घसरण सहन केली असून त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनुक्रमे ७ टक्के आणि ६ टक्के वाढ झाली आहे.
कोणाची काय स्थिती?
राधाकिशन दमानी यांच्या पोर्टफोलिओत २०२५ च्या सुरुवातीला सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत. डिसेंबर तिमाहीत २८ टक्के आणि सप्टेंबर तिमाहीत २२ टक्के घसरण झाल्यानंतर अॅव्हेन्यू सुपरमार्टच्या शेअरमधील नफा आणि चांगल्या कमाईमुळे त्यांच्या पोर्टफोलिओत सुधारणा होण्याची चिन्हं आहेत.
सचिन बन्सल यांचा पोर्टफोलिओ जूनच्या उच्चांकी पातळीच्या तुलनेत जवळपास ५० टक्क्यांनी घसरला आहे, ज्याचे एक कारण म्हणजे Venky's India मधील त्यांचा हिस्सा विकणं. एसएमएल इसुझु, जेके लक्ष्मी सिमेंट आणि लिबर्टी शूज सारख्या त्यांच्या उर्वरित शेअर्समध्येही ३० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)