Share Market : भारतीय शेअर बाजारात आज (२० नोव्हेंबर) सलग दुसऱ्या दिवशी चांगली तेजी पाहायला मिळाली. जागतिक बाजारातून मिळालेले मजबूत संकेत आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या ताज्या खरेदीमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या तेजीमुळे निफ्टीने सप्टेंबर २०२४ नंतर प्रथमच २६,२०० चा स्तर पार केला, तर सेन्सेक्समध्येही जोरदार उसळी दिसून आली.
निफ्टी पुन्हा ऑल-टाईम हायच्या जवळ
दिवसाच्या व्यवहारादरम्यान निफ्टी २६,२४६.६५ च्या नवीन ५२-आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. हा उच्चांक निफ्टीच्या सर्वकालीन उच्चांकापासून (२६,२७७.३५) केवळ ३० अंकांनी दूर आहे. दिवसाअखेर सेन्सेक्स ४४६.२१ अंकांच्या (०.५२%) वाढीसह ८५,६३२.६८ वर, तर निफ्टी १३९.५० अंकांच्या (०.५४%) वाढीसह २६,१९२.१५ च्या पातळीवर बंद झाला.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ
आजच्या तेजीमुळे बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात मोठी वाढ झाली. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे ६८,००० कोटी रुपयांनी वाढले, जे ४७६.४२ लाख कोटींवर पोहोचले. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी भर पडली.
बँकिंग इंडेक्समध्ये सलग चौथा विक्रम
निफ्टी बँकेच्या इंडेक्सने आज सलग चौथ्या व्यावसायिक दिवशी नवा विक्रम प्रस्थापित केला. बँक निफ्टीने ५९,४४०.१० चा नवीन विक्रमी उच्चांक गाठला आणि ०.२२% वाढीसह ५९,३४७.७० वर बंद झाला. खासगी बँका आणि आर्थिक क्षेत्रातील शेअर्समध्ये आजही मजबूत खरेदी दिसून आली. याशिवाय ऑटो, कॅपिटल गुड्स, ऑईल ॲण्ड गॅस, प्रायव्हेट बँक आणि ऊर्जा क्षेत्रातही तेजी राहिली.
ब्रॉडर मार्केटमध्ये उदासीनता
सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी तेजी असली तरी, मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स किंचित घसरणीसह बंद झाले. यावरून आजची खरेदी मुख्यत्वे लार्जकॅप शेअर्समध्ये केंद्रित होती, हे स्पष्ट होते.
प्रमुख शेअर्सची कामगिरी
सेंसेक्समध्ये बजाज फायनान्स (२.२८%) च्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी राहिली. यानंतर बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा आणि एचडीएफसी बँक यांसारख्या शेअर्समध्ये १.४२% ते २.२०% पर्यंतची वाढ झाली.
वाचा - रॅपिडो ड्रायव्हर महिन्याला कमावतोय १ लाख रुपये, उत्पन्नाचे स्रोत वाचून बसेल धक्का
दुसरीकडे, एशियन पेंट्स (१.२७%) सर्वाधिक घसरला. तसेच, एचसीएल टेक, टायटन, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि कोटक महिंद्रा बँकच्या शेअर्समध्ये ०.४७% ते १.२२% पर्यंत घसरण नोंदवली गेली.
