Multibagger Tata Stock: टाटा ग्रुपचा मल्टीबॅगर शेअर शेअर बाजारात खळबळ माजवत आहे. आम्ही ज्या शेअरबद्दल बोलत आहोत, तो 'तेजस नेटवर्क'चा आहे. बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात हा शेअर सुमारे 5 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता. या स्टॉकने गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
आज स्टॉकमध्ये मोठी वाढ
तेजस नेटवर्क्स लिमिटेडचा शेअर बुधवारी सुमारे 5 टक्क्यांनी वाढला. टाटाचा हा शेअर 725 रुपयांवर उघडला अन् काही वेळातच 759.50 रुपयांवर व्यवहार करताना दिसला. तेजसच्या शेअर्समधील या वाढीमुळे कंपनीचे बाजार भांडवल 12,810 कोटी रुपयांवर पोहोचला.
शेअर्सच्या वाढीचे कारण
कंपनीला मोठी ऑर्डर मिळाल्याच्या बातमीनंतर तेजस नेटवर्कच्या शेअर्समध्ये ही वाढ दिसून आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 18,685 ठिकाणी 4G मोबाईल नेटवर्कचा पुरवठा, स्थापना आणि देखभालीसाठी 1,525.53 कोटी रुपयांची नवीन ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNLने दिली आहे.
1 लाखाचे 23 लाख झाले
गेल्या पाच वर्षांत तेजस नेटवर्क्सचा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर स्टॉक म्हणून उदयास आला आहे. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना या कालावधीत 2281.54 टक्के इतका प्रचंड मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे. 22 मे 2020 रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त 31 रुपये होती. एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी तेजस नेटवर्क्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर ते 23,81,000 रुपये झाले असते.
75 देशांमध्ये कंपनीची सेवा
तेजस नेटवर्क्स ही टाटा ग्रुपची एक ऑप्टिकल आणि डेटा नेटवर्किंग उत्पादने उत्पादक कंपनी आहे. सेल टॉवर्स, डेटा सेंटर्स, टेलिकॉम एक्सचेंजेस, युटिलिटी साइट्स यासारख्या टेलिकॉम नेटवर्कमध्ये कंपनी सेवा पुरवते. तेजस नेटवर्क्स 75 हून अधिक देशांमध्ये आपली उत्पादने विकते.
(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)