Share Market Muhurat Trading : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आज (21 ऑक्टोबर 2025) बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर स्पेशल मुहूर्त ट्रेडिंग सत्र पार पडले. हे एक तासाचं विशेष सत्र दुपारी 1:45 वाजता सुरू होऊन 2:45 वाजता संपले.
सुरुवातीला तेजी, नंतर सौम्य घसरण
ट्रेडिंगच्या सुरुवातीला बाजारात उत्साह पाहायला मिळाला. BSE सेन्सेक्स जवळपास 300 अंकांनी वाढून उघडला. तर, NSE निफ्टी देखील 25,900 अंकांच्या वर व्यापार करत होता. दुपारी 1:55 वाजेपर्यंत, सेन्सेक्स 190 अंकांनी वाढून 84,552.82 वर, तर निफ्टी 63 अंकांनी वाढून 25,906.25 वर व्यवहार करत होता.
मात्र, ट्रेडिंगच्या दुसऱ्या अर्ध्या भागात बाजारात थोडी घसरण झाली आणि तेजी मर्यादित राहिली. मुहूर्त ट्रेडिंगचा सेशन 2:45 वाजता संपला आणि बाजार हलकी वाढ घेऊन बंद झाला. BSE सेन्सेक्स 62.97 अंकांच्या (0.07%) वाढीसह 84,426.34 अंकांवर बंद झाला, तर NSE निफ्टी 25.45 अंकांच्या (0.01%) वाढीसह 25,850 अंकांवर बंद झाला.
239 शेअर्ससाठी अप्पर सर्किट
आज बीएसईवर 4,178 शेअर्स सक्रिय होते. त्यापैकी 3,026 शेअर्स वधारले, तर 951 शेअर्स घसरले. तसेच, 174 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले, तर 42 शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.
टॉप गेनर
आजच्या व्यवहारात सिप्ला 1.58% वाढीसह आघाडीवर होता. तर, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील, ग्रासिम, अॅक्सिस बँक आणि डॉ. रेड्डीज यांचे शेअर्सही 1.18% ते 0.49% वधारले.
टॉप लूजर्स
कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, मारुती, टीसीए, ट्रेंड, भारती एअरटेल, मॅक्स हेल्थ, रिलायन्स, ओएनजीसी, इंडिगो आणि सन फार्मा यांचे शेअर्स 0.98% ते 0.32% दरम्यान घसरले.
दुसरीकडे मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा मुहूर्त ट्रेडिंगचा दिवस आनंद आणि चिंता दोन्ही घेऊन आला आहे.
सोन्याच्या किंमती: दिवसाच्या व्यवहारात सोनं ₹3,724 प्रति 10 ग्रॅमने घसरून ₹1,26,900 वर आलं. हा भाव सोन्याच्या लाइफटाइम हायपेक्षा ₹5,394 कमी आहे.
चांदीच्या किंमती: चांदी ₹9,479 प्रति किलोने घसरून ₹1,48,508 वर पोहोचली. शुक्रवारी चांदीने ₹1,70,415 प्रति किलोचा लाइफटाइम हाय गाठला होता. म्हणजे काही दिवसांतच चांदीत तब्बल ₹21,900 प्रति किलोची घसरण झाली आहे.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला घ्या.)