Tata capital ipo: टाटा समूहाची (Tata Group) कंपनी टाटा कॅपिटलच्या (Tata Capital) आयपीओची (IPO) प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. माहितीनुसार, हा IPO ६ ऑक्टोबर रोजी खुला होईल आणि ८ ऑक्टोबर रोजी बंद होईल. तसंच, अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली प्रक्रिया ३ ऑक्टोबर रोजी सुरू होईल. तथापि, कंपनीनं अद्याप इश्यू प्राइसची (Issue Price) घोषणा केलेली नाही. IPO चा आकार १७,२०० कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे.
कोण विकत आहे हिस्सा?
कंपनीच्या अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (UDRHP) IPO मध्ये २१ कोटी नवीन शेअर्स जारी केले जातील, तर २६.५८ कोटी शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) विकले जातील. अशा प्रकारे, एकूण ४७.५८ कोटी शेअर्स बाजारात उपलब्ध असतील. ऑफर फॉर सेल अंतर्गत, प्रमोटर टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आपले २३ कोटी शेअर्स विकेल. तर, गुंतवणूकदार इंटरनेशनल फायनान्स कॉर्पोरेशन (IFC) ३.५८ कोटी शेअर्स विकण्याच्या तयारीत आहे.
या IPO साठी बुक रनिंग लीड मॅनेजर्समध्ये कोटक महिंद्रा कॅपिटल, ॲक्सिस कॅपिटल, बीएनपी परिबास, एचडीएफसी बँक, एचएसबीसी सिक्युरिटीज, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आयआयएफएल कॅपिटल, जेपी मॉर्गन इंडिया आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स यांचा समावेश आहे.
अनलिस्टेड शेअर्सवर दबाव
IPO पूर्वी टाटा कॅपिटलच्या अनलिस्टेड शेअर्सवर दबाव दिसून येत आहे. अनलिस्टेडझोन आणि शेअर्सकार्ट.कॉम नुसार, हे शेअर्स सध्या सुमारे ७३५ रुपये प्रति शेअर दराने ट्रेड होत आहेत, तर एप्रिलमध्ये त्यांची पातळी १,१२५ रुपयांपर्यंत पोहोचली होती. म्हणजेच, त्यात जवळपास ३५% ची घट झाली आहे. तर, वेल्थ विस्डम त्यांची किंमत आणखी कमी म्हणजे ६५० रुपये सांगत आहे.
ईटीच्या वृत्तानुसार, मेहता इक्विटीजचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट आणि रिसर्च ॲनालिस्ट प्रशांत तपासे यांनी सांगितले की, अलीकडील घट हे एनबीएफसी (NBFC) क्षेत्रावरील दबाव, व्यापक बाजारातील सुधारणा आणि गुंतवणूकदारांच्या सावधगिरीचा परिणाम आहे. तर, अनलिस्टेड बाजाराचं वैशिष्ट्य आहे की येथे लिक्विडिटीची कमतरता असते, ज्यामुळे किमतींमध्ये मोठे चढ-उतार होतात, अशी प्रतिक्रिया हायब्रो सिक्युरिटीजचे फाउंडर आणि एमडी तरुण सिंह यांनी दिली.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती दिली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)