Mtnl Share Price Today: होळीपूर्वी शेअर बाजारात आज चांगली तेजी पाहायला मिळत आहे. यापूर्वी बुधवारी निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक रेड झोनमध्ये सपाट पातळीवर बंद झाले. दरम्यान, आजच्या व्यवहारात टेलिकॉम क्षेत्रातील सरकारी कंपनी महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (MTNL) शेअर्समध्ये मोठी उसळी दिसून आली. गुरुवारी कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल १८ टक्क्यांची वाढ झाली.
शेअरमध्ये १८ टक्क्यांपर्यंत वाढ
गुरुवारी एमटीएनएलचा शेअर ४६.३० रुपयांवर खुला झाला, तर शेअरनं ५१.१८ रुपयांचा इंट्राडे उच्चांक बनवला. याआधी बुधवारी तो ४३.२४ रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. मात्र सकाळच्या सुमारास कंपनीचा शेअर १३.७४ टक्क्यांच्या वाढीसह ४९.१८ च्या पातळीवर व्यवहार करत होता. असेट मॉनिटायझेशनमधून बीएसएनएलला २,१३४.६१ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळाल्यानंतर ही वाढ झाली आहे.
लोकसभेत आकडेवारी सादर
दळणवळण राज्यमंत्री पेम्मासानी चंद्रशेखर यांनी लोकसभेत शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२५ पर्यंत बीएसएनएलनं असेट मॅनेजमेंटच्या माध्यमातून २,३८७.८२ कोटी रुपये आणि एमटीएनएलनं २,१३४.६१ कोटी रुपये कमावले आहेत. "बीएसएनएल आणि एमटीएनएल नजीकच्या भविष्यात स्वत:च्या वापरासाठी आवश्यक नसलेल्या आणि ज्यांच्या मालकीचं हस्तांतरण करण्याचा अधिकार आहे, अशाच जमिनी आणि इमारतींचं मॉनिटायझेशन करत आहे,: असं केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री यांनी आपल्या लेखी निवेदनात म्हटलंय.
सादर केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२५ पर्यंत बीएसएनएलनं टॉवर्स आणि फायबरसह जवळच्या मालमत्तेच्या मॉनिटाझेशनमधून ८,२०४.१८ कोटी रुपये आणि एमटीएनएलनं २५८.२५ कोटी रुपये कमावले आहेत.
गुंतवणूकदारांना वर्षभरात ५० टक्के परतावा
गेल्या महिनाभरात एमटीएनएलच्या शेअर्समध्ये किरकोळ घसरण झाली आहे, तर ६ महिन्यांच्या कालावधीत १७ टक्क्यांहून अधिक करेक्शन झालंय. तर, गुंतवणूकदारांना १ वर्षाच्या कालावधीत ५० टक्क्यांचा नफा मिळालाय. याशिवाय पाच वर्षांच्या कालावधीत ६०० टक्क्यांहून अधिक मल्टिबॅगर परतावा मिळालाय.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)