RBL Bank Share Price : देशातील आघाडीची ऑटो कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा खासगी क्षेत्रातील आरबीएल बँकेतील आपला संपूर्ण हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. महिंद्राची बँकेत सध्या ३.५% भागीदारी आहे. ही भागीदारी जवळपास ६९१ कोटी रुपयांच्या ब्लॉक डीलद्वारे विकली जाईल. यामुळे महिंद्रा कंपनी आरबीएल बँकेतून पूर्णपणे बाहेर पडेल.
मिळालेल्या माहितीनुसार, ही विक्री गुरुवारी होणार असून, या व्यवहारासाठी कोटक सिक्युरिटीज एकमेव ब्रोकर म्हणून काम पाहणार आहे. या मोठ्या घडामोडीमुळे गुरुवारी महिंद्रा अँड महिंद्रा आणि आरबीएल बँक या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स बाजारात चर्चेत राहतील.
विक्रीचा फ्लोर प्राइस आणि हिस्सा
महिंद्राने आरबीएल बँकेच्या शेअर्सच्या विक्रीसाठी ३१७ रुपये प्रति शेअर इतका फ्लोर प्राइस निश्चित केली आहे. हा फ्लोर प्राइस ४ नोव्हेंबर रोजी NSE वर आरबीएल बँकेच्या बंद किमतीपेक्षा (३२३.८) २.१% कमी आहे. या ब्लॉक डीलमध्ये एकूण २.१२ कोटी इक्विटी शेअर्स विकले जाऊ शकतात, जे बँकेच्या एकूण भागभांडवलाच्या सुमारे ३.४५% असेल.
महिंद्रासाठी 'फायद्याचा सौदा'
जुलै २०२३ मध्ये महिंद्राने आरबीएल बँकेत ३.५% हिस्सा खरेदी करण्यासाठी ४१७ कोटी रुपये गुंतवले होते. आता कंपनीला या विक्रीतून सुमारे ६९१ कोटी रुपये मिळतील. याचा अर्थ महिंद्राला केवळ दोन वर्षांहून अधिक कालावधीत २७४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा होणार आहे. सध्याच्या किमतीनुसार, हा हिस्सा विकून महिंद्राला ६०% हून अधिक फायदा होण्याची अपेक्षा आहे.
वाचा - भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
UAE ची बँक करणार मोठी गुंतवणूक
या घडामोडींमध्ये, संयुक्त अरब अमिरातीची दुसरी सर्वात मोठी बँक एमिरेट्स NBD बँक PJSC ने गेल्या महिन्यात आरबीएल बँकेत मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. एमिरेट्स NBD बँकने बँकेत जास्तीत जास्त हिस्सा खरेदी करण्यासाठी २६,५८० कोटी रुपये गुंतवण्याची तयारी दर्शवली आहे. ही गुंतवणूक २८० रुपये प्रति शेअर दराने प्रेफरेंशियल अलॉटमेंटद्वारे ६०% हिस्सा खरेदी करण्यासाठी असणार आहे.
