IPO News Updates: जर तुम्ही एलजी इंडिया आणि टाटा कॅपिटल सारख्या मोठ्या कंपन्यांचे आयपीओ चुकवले असतील, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. कॅनरा एचएसबीसी लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा आयपीओ आज, १० ऑक्टोबर रोजी उघडत आहे. ग्रे मार्केटमध्येही कंपनीची स्थिती सकारात्मक दिसते.
काय आहे प्राईज बँड?
कॅनरा एचएसबीसी लाईफ इन्शुरन्स आयपीओची प्राईज बँड ₹१०० ते ₹१०६ प्रति शेअर अशी निश्चित करण्यात आलेली आहे. कंपनीनं १४० शेअर्सचा एक लॉट तयार केलाय. परिणामी, गुंतवणूकदारांना किमान ₹१४,८४० गुंतवणूक करावी लागेल. आयपीओ १४ ऑक्टोबरपर्यंत खुला राहील.
आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजाराचं सुस्त ओपनिंग; निफ्टीही घसरला, NBFC-बँकिंग शेअर्समध्ये तेजी
आयपीओची साईज काय?
या मेनबोर्ड आयपीओचा आकार २५१७.५० कोटी रुपयांचा आहे. कंपनीचा हा इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेलवर आधारित आहे. कंपनी २३.७५ कोटी ऑफर शेअर्स जारी करेल. म्हणजेच, सध्याचे गुंतवणूकदार त्यांच्या वाट्याचे शेअर्स विकत आहेत. आयपीओद्वारे कंपनी नवीन शेअर्स जारी करणार नाही. याचा अर्थ असा की, आयपीओमधून जमा झालेल्या पैशांचा उपयोग कंपनीला करता येणार नाही. हा मेनबोर्ड आयपीओ आहे आणि त्याची लिस्टिंग बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) मध्ये होईल.
ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
इन्वेस्टर्स गेनच्या रिपोर्टनुसार, ग्रे मार्केटमध्ये हा आयपीओ १० रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. सध्याचा जीएमपी कंपनीच्या आयपीओला ९.४३ टक्के लिस्टिंग गेन दाखवत आहे. गेल्या ३ दिवसांपासून कंपनीच्या आयपीओच्या जीएमपीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्शुरन्स आयपीओचा (Canara HSBC Life Insurance IPO) सर्वाधिक जीएमपी प्रति शेअर १४ रुपये राहिला आहे. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी कंपनीचा आयपीओ या स्तरावर होता.
कोणासाठी किती हिस्सा आरक्षित?
- क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी (Qualified Institutional Buyers - QIB) जास्तीत जास्त ५० टक्के हिस्सा आरक्षित राहील.
- त्याचबरोबर, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) किमान ३५ टक्के हिस्सा आरक्षित राहील.
- एनआयआयसाठी (Non-Institutional Investors - NII) १५ टक्के हिस्सा आरक्षित राहील.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)