Mazagon Dock Stock Price: आजपासून शेअर बाजारातील जानेवारी मालिकेला सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने ही बॅडन्यूज दिली. गुरुवारी, (२६ डिसेंबर २०२४) माझगाव डॉक शिपबिल्डर्सचे शेअर्स ४,७५० रुपयांवर बंद झाले. पण शुक्रवारी सकाळी म्हणजेच २७ डिसेंबर २०२४ रोजी बाजार उघडला तेव्हा कंपनीच्या शेअरची किंमत २,३७५ रुपये होती. विशेष म्हणजे कंपनीच्या समभागांनी अलीकडेच ५,८६० रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकी किमती गाठल्या होत्या. त्यामुळे अचानक शेअर इतका कोसळल्यानंतर गुंतवणूकदारांचे तोंडचे पाणी पळाले आहेत.
माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा शेअर्स का कोसळला?
शुक्रवारी माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअर्सची किंमत निम्मी का झाली? एक्सचेंजवर जारी केलेल्या माहितीनुसार - कंपनीने २७ डिसेंबरपासून शेअर विभाजनाची घोषणा केली होती. ती आजपासून आमलात आणली आहे. शेअरचे दर्शनी मूल्य (फेस व्हॅल्यू) कमी करणे याला शेअर स्प्लिट म्हणतात. माझगाव डॉकच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य सुरुवातीला १० रुपये होते. जो आता प्रति शेअर ५ रुपये करण्यात आला आहे. विभाजनासोबतच रेकॉर्ड डेटवरील शेअरचा बाजारभावही २ भागांमध्ये समायोजित करण्यात आली आहे.
गुंतवणूकदारांनी घाबरुन जाण्याची गरज नाही
शेअर स्प्लिट विशेषतः तरलता आणि व्हॉल्यूम वाढवण्याच्या उद्देशाने केले जाते. शेअर विभाजनाचा उद्देश अधिकाधिक किरकोळ गुंतवणूकदारांना भागधारक बनवणे हा आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदाराने घाबरून जाण्याची गरज नाही. कारण त्यांच्याकडील शेअर्सची किंमत दुप्पट झाली असेल. समजा एखाद्याने १०० शेअर्स विकत घेतले असतील तर आता त्याचे २०० शेअर्स झाले आहेत. या शेअरने एका महिन्यात ३ टक्के, ३ महिन्यांत १० टक्के, एका वर्षात १०० टक्के आणि तीन वर्षांत १७०० टक्के वाढला आहे.