Mazagon Dock Dividend: प्रसिद्ध संरक्षण कंपनी मझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षी कंपनी तिसऱ्यांदा लाभांश देत आहे. तसेच, चालू आर्थिक वर्षातील हा पहिला अंतरिम लाभांश असेल. या संरक्षण कंपनीनं सोमवारी तिमाही निकालांची घोषणा केली होती.
महसूल आणि निव्वळ नफ्यात वाढ
मझगांव डॉकचा महसूल सप्टेंबर तिमाहीत ६.३ टक्क्यांनी वाढून ₹२,९२९.२४ कोटी राहिला आहे. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ₹२,७५६.८३ कोटी होता. जुलै ते सप्टेंबर दरम्यान मझगांव डॉकचा निव्वळ नफा ₹७४९.४८ कोटी होता, जो वार्षिक आधारावर २८ टक्के अधिक आहे. मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत कंपनीला ₹५८५.०८ कोटी निव्वळ नफा झाला होता.
लाभांश देण्याचा निर्णय
मझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनं लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं एका शेअरवर ₹६ चा लाभांश देण्याची घोषणा केली आहे. हा २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी पहिला अंतरिम लाभांश आहे. कंपनीनं लाभांशासाठी ४ नोव्हेंबर ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. पात्र गुंतवणूकदारांना २६ नोव्हेंबरपूर्वी लाभांशाचं वितरण केलं जाईल.
या वर्षी कंपनीने यापूर्वी एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यात एक्स-डिविडेंड ट्रेड केलं होतं. तेव्हा कंपनीनं एका शेअरवर अनुक्रमे ₹३ आणि ₹२.७१ चा लाभांश दिला होता.
शेअर बाजारात कंपनीची कामगिरी कशी?
सोमवारी मझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा शेअर ०.१९ टक्क्यांच्या वाढीसह ₹२,८१०.१५ च्या पातळीवर बंद झाला होता. गेल्या एका वर्षात मझगांव डॉकच्या शेअर्सच्या किंमतीत ३८ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. ५ वर्षांत या संरक्षण कंपनीनं पोझिशनल गुंतवणूकदारांना ३,२२९ टक्के परतावा दिला आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
