Share Market : गेल्या आठवडाभरापासून गुंतवणूकदारांना घाम फोडणाऱ्या शेअर बाजारातील घसरणीचे सत्र अखेर आज थांबले. सुरुवातीच्या सत्रात मोठी पडझड होऊनही, दुपारनंतर बाजार सावरला आणि सलग पाच दिवसांच्या पडझडीनंतर दोन्ही निर्देशांक 'हिरव्या निशाणा'मध्ये बंद झाले. बीएसई सेन्सेक्स ३०१.९३ अंकांच्या (०.३६%) वाढीसह ८३,८७८.१७ वर, तर एनएसई निफ्टी १०६.९५ अंकांच्या (०.४२%) मजबुतीसह २५,७९०.२५ अंकांवर स्थिरावला.
टाटा स्टीलचा 'स्टील'सारखा भरवसा!
आजच्या बाजाराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे टाटा समूहातील टाटा स्टीलच्या शेअरमधील तेजी. हा शेअर २.७५ टक्क्यांनी वधारून सेन्सेक्समधील सर्वाधिक नफा देणारा शेअर ठरला. दुसरीकडे, आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिस मात्र १.१६ टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक तोट्यात राहिली.
सेन्सेक्समधील प्रमुख ३० कंपन्यांची स्थिती
आज सेन्सेक्समधील ३० पैकी २५ कंपन्यांनी नफा कमावला, तर केवळ ५ कंपन्यांना नुकसान सोसावे लागले.
तेजीचे मानकरी
एशियन पेंटस् (२.५४%), ट्रेंट (२.०५%), स्टेट बँक ऑफ इंडिया (१.५१%), हिंदुस्थान युनिलिव्हर (१.३६%), अल्ट्राटेक सिमेंट (१.२६%), आणि आयसीआयसीआय बँक (१.१४%). याशिवाय टीसीएस, भारती एअरटेल, रिलायन्स आणि अदानी पोर्ट्स हे शेअर्सही हिरव्या चिन्हात बंद झाले.
घसरणीचे केंद्र
इन्फोसिसपाठोपाठ बजाज फायनान्स (०.९३%), बीईएल (०.२९%), एचडीएफसी बँक (०.२२%) आणि एल अँड टी (०.२०%) या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला.
वाचा - ८ वा वेतन आयोग : मूळ पगार दुप्पट होणार? 'फिटमेंट फॅक्टर'नुसार तुमचा पगार नेमका किती वाढू शकतो?
निफ्टी ५० चा कौल
निफ्टीच्या ५० पैकी ३९ कंपन्या आज वधारल्या, तर ११ कंपन्यांचे शेअर्स घसरले. बँकिंग, मेटल आणि एफएमसीजी क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला खालच्या स्तरावरून सावरण्यास मदत झाली. गेल्या पाच सत्रांत गुंतवणूकदारांनी गमावलेली काही रक्कम आजच्या रिकव्हरीमुळे परत मिळाल्याने बाजारात समाधानाचे वातावरण आहे.
