Stock Market Jitters : गेल्या वर्षभरापासून शेअर मार्केट अस्थिर आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये सेन्सेक्सने ८६,००० चा टप्पा ओलांडला होता. वर्षभरात ८०,००० पर्यंत खाली आला. दुसरीकडे २५,००० असणारा निफ्टी देखील २०,००० च्या आसपास घुटमळत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाल्याचे समोर आले आहे. बाजारातील अस्थिरतेमुळे आणि मूल्यांकनाबाबत असलेल्या चिंतेमुळे ब्रोकरेज फर्म्सना मोठा झटका बसला आहे. चालू आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर २०२५) चार मोठ्या डिस्काउंट ब्रोकरेज फर्म्ससह एकूण सुमारे २६ लाख सक्रिय गुंतवणूकदारांनी बाजाराला रामराम केला आहे.
या २६ लाख ग्राहकांपैकी जवळपास ७५% क्लायंट्स तर देशातील सर्वात मोठ्या चार ब्रोकरेज फर्म्समधून बाहेर पडले आहेत. या धक्क्याची तीव्रता यावरून लक्षात येते की, या वर्षाच्या (२०२५) पहिल्या ९ महिन्यांत एकूण सुमारे ५० लाख सक्रीय गुंतवणूकदार ब्रोकरेज फर्म्सनी गमावले आहेत, त्यापैकी निम्मे फक्त जुलै-सप्टेंबर या एका तिमाहीत गमावले आहेत.
ग्रो आणि झिरोदाला सर्वाधिक फटका
- ग्रो : सर्वाधिक ६.७३ लाख सक्रिय ग्राहकांची घट नोंदवली गेली.
- झिरोदा : नितीन कामत यांच्या झिरोदाने सुमारे ५ लाख क्लायंट्स गमावले.
- एंजेल वन : एंजल वनने सुमारे ४.३४ लाख क्लायंट्स बाहेर पडले.
- अपटॉक्स : सुमारे ३ लाख सक्रिय क्लायंट्सने अपस्टॉक्सकडे पाठ फिरवली.
या व्यतिरिक्त, मिरे ॲसेटच्या एमडॉटस्टॉक (१.३ लाख), एचडीएफसी सिक्युरिटीज (६१ हजार), मोतीलाल ओसवाल (५९ हजार) आणि शेअरखान (५९ हजार) या ब्रोकरेज फर्म्सनाही मोठा फटका बसला आहे.
गुंतवणूकदारांनी का पाठ फिरवली?
- बाजारात विक्रीचा दबाव: या वर्षाच्या सुरुवातीपासूनच देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने नफावसुली आणि विक्रीचा दबाव आहे.
- आयपीओची सुस्त लिस्टिंग : काही प्रमुख आयपीओची (लिस्टिंग सुस्त राहिली, तर काही आयपीओ डिस्काउंटवर लिस्ट झाले. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांच्या भावनांना धक्का बसला.
- आर्थिक परिणाम : कंपन्यांचे तिमाही व्यावसायिक निकाल अपेक्षेप्रमाणे न आल्याने गुंतवणूकदार सावध झाले.
- जागतिक तणाव : जागतिक स्तरावरील भू-राजकीय तणाव आणि व्यापार युद्धामुळे बाजारावरील विश्वास डळमळीत झाला.
सप्टेंबर तिमाहीत इक्विटी बेंचमार्क सेन्सेक्स ४% आणि निफ्टी ५० ३.६% ने कमकुवत झाला, तर व्यापक बाजारात बीएसई मिडकॅप ४.२% आणि बीएसई स्मॉलकॅप ४.६% ने घसरला होता.
काहींचे क्लायंट्स वाढले!
बाजारपेठेतील या मोठ्या उलथापालथीमध्येही काही ब्रोकरेज फर्म्स त्यांचे ग्राहक वाढवण्यात यशस्वी झाले. पेटीएम मनीने सप्टेंबर तिमाहीत ५१ हजारांहून अधिक क्लायंट्स जोडले. याशिवाय एसबीआय कॅप सिक्युरिटीज (४४ हजार), आदित्य ब्रोकिंग (२८.६ हजार), आयसीआयसीआय सिक्युरिटीज (२७ हजार) आणि चॉईस इक्विटी (२१.४ हजार) यांनीही क्लायंट्सची संख्या वाढवली.
वाचा - टाटा समूहाच्या इतिहासात पहिल्यांदाच नियमात मोठा बदल! एन चंद्रशेखरन करणार हॅट्ट्रिक
या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, सध्या किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये मोठी नफावसुली झाली आहे असून थांबा आणि पहा अशी भूमिका घेतली आहे.