lloyds metals and energy limited : आतापर्यंत हिरे व्यापाऱ्याने कर्मचाऱ्यांना कार भेट दिल्याच्या तुम्ही अनेक बातम्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील. अशीच एक बातमी आता राज्यातील नक्षलवादी भागातील गडचिरोली येथून समोर आली आहे. इथं कुठल्या व्यापाऱ्याने नाही तर एका मेटल कंपनीने कर्मचाऱ्यांना कोट्याधीश केलं आहे. कंपनीने १३३७ रुपये किमतीचे शेअर्स केवळ ४ रुपयांना आपल्या कर्मचाऱ्यांना दिले. लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे. लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनी लोखंडाची खाण चालवत असून स्टील कॉम्प्लेक्स विकसित करते.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कंपनीने सुमारे ६००० कामगारांना ही भेट दिली आहे, त्यापैकी सुमारे ८० टक्के कामगार खाणीत काम करतात. नवीन वर्षाच्या दिवशी, १३३७ रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स ४ रुपये प्रति शेअर या नाममात्र किमतीवर कामगारांना देण्यात आले. बरेच कर्मचारी दुर्गम आदिवासी भागातील आहेत. यातील काही तर पूर्वाश्रमीचे माओवादी आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप पत्रे
कंपनीने आपल्या कामगारांना स्वस्त दरात शेअर्स देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मश्री पुरस्कार विजेते तुलसी मुंडा आणि एलएमईएलच्या ओडिशा युनिटमधील एक आदिवासी सामाजिक कार्यकर्ता आणि २ आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना शेअर सर्टिफिकेट दिले. कंपनीने तुलसी मुंडा यांना अंदाजे १ कोटी ३० लाख रुपये किमतीचे १०,००० शेअर्स दिले.
तुम्ही कंपनीचे मालक आहात : देवेंद्र फडणवीस
शेअर वाटप कार्यक्रमात कामगारांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, तुम्ही लोक कंपनीचे मालक आहात. यावेळी त्यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरन यांचे कौतुक केले आणि सांगितले की, जिथे कोणी गेले नव्हते तिथे खाणकाम सुरू करण्याचे धाडस त्यांनी दाखवले आहे. हे शेअर्स कामगारांना कंपनीचे मालक बनतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. फडणवीस पुढे म्हणाले की, आणखी ५ वर्षे वाट पाहा, तुम्हाला पाचपट परतावा मिळेल. जर बी प्रभाकरन व्यवस्थापकीय संचालक असतील तर तुम्ही सर्वजण कंपनीचे मालक आहात.
प्रत्येकाला किमान १०० शेअर्स मिळाले
कंपनीने अनुभव आणि दीर्घ कामाचे तास असलेल्या कामगारांना अधिक शेअर्स दिले आहेत. किमान २ वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांना किमान १०० शेअर्स मिळाले आहेत. या शेअर्ससाठी कोणताही लॉक-इन कालावधी नाही. भविष्यात देखील अशा प्रकारे शेअर्सचे वाटप होण्याची शक्यता आहे. जे कामगिरीवर अवलंबून असेल. एलएमईएलच्या सूरजागढ लोह खनिज खाणीची सध्याची क्षमता ९ दशलक्ष टन आहे, ती २५ दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याची योजना आहे. कंपनी कोनसारी गावात २४,०००-२५,००० कोटी रुपयांचा एकात्मिक स्टील प्लांट देखील बांधत आहे.