LG Electronics India IPO : कोरियन कंपनी एलजी इलेक्ट्रॉनिक्स आपला आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीनं आयपीओसाठी सेबीकडे अर्ज केला आहे. देशातील हा आतापर्यंतचा चौथा सर्वात मोठा आयपीओ असेल आणि कोरियन कंपनीचा दुसरा सर्वात मोठा आयपीओ असेल. यापूर्वी कोरियन कंपनी ह्युंदाईनेही आयपीओ (Hyundai Motors India IPO) आणला होता.
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियानं १.८ बिलियन डॉलर्सच्या (सुमारे १५,००० कोटी रुपये) आयपीओसाठी अर्ज केला आहे. कंपनी एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियामधील १५ टक्के हिस्सा विकून आयपीओच्या माध्यमातून १५,००० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. शुक्रवारी भारतीय कंपनीनं बाजार नियामक सेबीकडे आपली कागदपत्रं सादर केली. आयपीओच्या कागदपत्रांवरून असं दिसून आलंय की मूळ कोरियन कंपनी ऑफरद्वारे सुमारे १०.२ कोटी शेअर्स विकण्याचा प्रस्ताव ठेवत आहे.
चौथा मोठा आयपीओ
एलजीचा आयपीओ हा देशातील चौथा सर्वात मोठा आयपीओ असेल. कोरियन कंपनीचा हा दुसरा सर्वात मोठा आयपीओ असेल. कोरियन कंपनी ह्युंदाईनं या वर्षी देशातील सर्वात मोठा आयपीओ आणला. ह्युंदाईच्या आयपीओची इश्यू साइज २७,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त होती.
कोणते आहेत ५ मोठे आयपीओ?
नुकताच आलेला ह्युंदाईचा आयपीओ हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ होता. त्यानंतर २०२२ मध्ये आलेल्या एलआयसीच्या आयपीओचा क्रमांक येतो. याची इश्यू साईज २१००० कोटी रुपये होती. त्यानंतर पेटीएमचा नंबर येतो. पेटीएमच्या आयपीओची इश्यू साईज १८३०० कोटी रुपये होती. कंपनीचा आयपीओ २०२१ मध्ये आला होता. यानंतर येणाऱ्या एलजीच्या आणि नंतर स्विगीच्या आयपीओचा नंबर येतो. यांची अनुक्रमे साईज १५ हजार कोटी आणि ११३२७ कोटी रुपये आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या माहितीनुसार, आयपीओतील ३५ टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी, ५० टक्के इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी आणि उर्वरित १५ टक्के नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
या आयपीओमधील शेअर्स ओएफएस अंतर्गत जारी केले जातील. म्हणजेच कोणतेही नवे शेअर्स जारी केले जाणार नाहीत. म्हणजेच एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाला यातून कोणतंही उत्पन्न मिळणार नाही. यात सर्वसामान्य गुंतवणूकदार कधी बोली लावू शकतील, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण हा आयपीओ या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये येऊ शकतो, असं मानलं जात आहे.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)