Lenskart IPO : बहुप्रतिक्षित आयपीओ नंतर सोमवारी शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या लेन्सकार्ट सोल्युशन्स लिमिटेडच्या शेअर्सची सुरुवात अत्यंत कमजोर झाली. कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला असला तरी, लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा झटका दिला.
सवलतीत लिस्टिंग, नंतर मोठी घसरण
बीएसई वर लेन्सकार्टचा शेअर ४०२ रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत ३% सवलतीसह ३९० रुपयांवर सूचीबद्ध झाला. लिस्टिंगनंतर लगेचच यात मोठी घसरण झाली आणि शेअर ११.५२% ने घसरून ३५५.७० रुपयांपर्यंत खाली आला. मात्र, दिवसभर शेअर्समध्ये खरेदी-विक्रीचा जोर दिसून आला आणि नंतर भावात सुधारणा होऊन तो ४०३.८० रुपये प्रति शेअरवर पोहोचला, जी ०.४४% ची किरकोळ वाढ दर्शवते. तर एनएससीवर देखील कंपनीचा शेअर इश्यू प्राइसपेक्षा १.७४% कमी, म्हणजेच ३९५ रुपये प्रति शेअरवर सूचीबद्ध झाला. घसरणीनंतर हा शेअर ३५६.१० रुपयांपर्यंत खाली आला, पण नंतर ४०४ रुपयांपर्यंत सुधारला. या लिस्टिंगनंतर कंपनीचे बाजार भांडवल ६९,०९१.२१ कोटी रुपये इतके झाले आहे.
चांगला प्रतिसाद मिळूनही आपटला
लेन्सकार्टच्या ७,२७८ कोटींच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला होता. हा इश्यू शेवटच्या दिवशी तब्बल २८.२६ पट अधिक सबस्क्राइब झाला होता. संस्थागत गुंतवणूकदारांकडून सर्वाधिक मागणी दिसून आली होती. आयपीओचा प्राइस बँड ३८२ ते ४०२ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. यात २,१५० कोटींचा फ्रेश इश्यू आणि प्रमोटर्स व गुंतवणूकदारांनी विकलेले १२.७५ कोटी इक्विटी शेअर्सचा ऑफर फॉर सेल समावेश होता.
आयपीओतून मिळालेल्या निधीचा वापर
नवीन 'कंपनी-ऑपरेटेड, कंपनी-ओन्ड स्टोअर्स' उघडणे.
भाड्याने घेतलेल्या जागांचे भाडे भरणे.
तंत्रज्ञान आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करणे.
ब्रँड मार्केटिंग आणि कंपनीचा विस्तार करणे.
कंपनीची पार्श्वभूमी
२००८ मध्ये स्थापन झालेल्या लेन्सकार्टने २०१० मध्ये ऑनलाइन आयवियर प्लॅटफॉर्म म्हणून सुरुवात केली. २०१३ मध्ये दिल्लीत पहिले स्टोर उघडल्यानंतर, आज कंपनी देशभरातील मेट्रो, टियर-१ आणि टियर-२ शहरांमध्ये मजबूत उपस्थितीसह दक्षिण-पूर्व आशिया आणि मध्य पूर्व मध्येही व्यवसाय करत आहे.
वाचा - पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
लिस्टिंगपूर्वीच्या निधी उभारणी फेरीत एसबीआय म्युच्युअल फंडाने लेन्सकार्टमध्ये १०० कोटी रुपये, तर डीमार्टचे संस्थापक राधाकिशन दमाणी यांनी सुमारे ९० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
