Lenskart IPO: सध्या चर्चेत असलेल्या लेंसकार्ट (Lenskart) IPO बाबात एक मोठी माहिती समोर आली आहे. IPO येण्यापूर्वीच देशातील सर्वात मोठ्या SBI म्युच्युअल फंड (SBI Mutual Fund) ने यात तब्बल ₹100 कोटींची गुंतवणूक केली आहे. या व्यवहारानंतर लेंसकार्ट कंपनीचे व्हॅल्यूएशन सुमारे 7.7 अब्ज डॉलर्स इतकी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसबीआय म्युच्युअल फंडने आपल्या दोन पर्यायी गुंतवणूक निधी (एआयएफ-ऑप्टिमल इक्विटी फंड आणि एसबीआय इमर्जंट फंड) द्वारे हे 100 कोटी रुपये गुंतवले आहेत.
दोन्ही फंडांनी मिळून कंपनीच्या सह-संस्थापकांपैकी एक असलेल्या नेहा बंसल यांच्याकडून 24.87 लाख शेअर्स प्रत्येकी ₹402 दराने विकत घेतले आहेत. हा सेकंडरी व्यवहार आहे. म्हणजेच, गुंतवलेले पैसे थेट कंपनीकडे न जाता, विद्यमान शेअरधारकाकडे (नेहा बंसल) गेले आहेत.
राधाकिशन दमानी यांचीही मोठी गुंतवणूक
विशेष म्हणजे, लेंसकार्टमध्ये रस दाखवणाऱ्यांमध्ये एसबीआय म्युच्युअल फंड एकटा नाही. डीमार्टचे संस्थापक आणि शेअर बाजारातील दिग्गज राधाकिशन दमानी यांनी देखील काही दिवसांपूर्वी ₹90 कोटींच्या प्री-IPO डीलद्वारे लेंसकार्टमध्ये हिस्सा घेतला आहे.
IPO ची तारीख काय?
लेंसकार्टचा अँकर राउंड 29 ऑक्टोबर रोजी उघडेल, तर 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी खुला असेल. कंपनीचा उद्देश ₹2,150 कोटींची रक्कम उभारण्याचा असून, ही रक्कम फ्रेश इश्यू स्वरुपात असेल.
यासोबतच विद्यमान गुंतवणूकदारांकडून 12.76 कोटी शेअर्सपर्यंतची विक्री (OFS – Offer For Sale) केली जाईल. OFS मध्ये आपले शेअर्स विकणाऱ्यांमध्ये - संस्थापक व CEO पियूष बंसल, SoftBank, Kedaara Capital, ChrysCapital, KKR, आणि Alpha Wave Ventures यांचा समावेश आहे.
रक्कम कुठे वापरली जाणार?
कंपनीच्या संशोधित RHP (Red Herring Prospectus) नुसार, उभारलेल्या निधीचा वापर पुढील तीन वर्षांत नवीन स्टोअर्स उघडण्यासाठी, भाडेपट्टे व रिअल इस्टेट खर्चासाठी, तंत्रज्ञान आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी, तसेच ब्रँड मार्केटिंग आणि संभाव्य अधिग्रहणासाठी केला जाईल.
लेंसकार्टची कामगिरी
आर्थिक वर्ष 2025 (FY25) मध्ये कंपनीने ₹297 कोटींचा निव्वळ नफा कमावला, तर याच कालावधीत मागील वर्षी (FY24) ₹10 कोटींचा तोटा झाला होता. या दरम्यान कंपनीचा महसूल 23% वाढून ₹6,652 कोटींवर पोहोचला. तसेच, चालू आर्थिक वर्षाच्या Q1 FY26 (जून 2025) तिमाहीत कंपनीने ₹1,894.5 कोटींच्या उत्पन्नावर ₹61.2 कोटींचा नफा नोंदवला आहे. EBITDA देखील 183.4 कोटींवरुन वाढून 336.6 कोटींवर गेला आहे, ज्यामुळे कंपनीच्या नफा वाढीचा ट्रेंड अधिक मजबूत झाल्याचे दिसते.
(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)
