IT Stocks Crash: भारतीय शेअर बाजारातील अत्यंत विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या आयटी क्षेत्रासाठी फेब्रुवारी महिना एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरत आहे. अवघ्या १३ दिवसांच्या कालावधीत आयटी कंपन्यांचं बाजार मूल्य सुमारे ५० अब्ज डॉलर म्हणजेच साधारण ४.५ लाख कोटी रुपयांनी घटलंय. शुक्रवारी संपलेल्या व्यापारी आठवड्यात निफ्टी आयटी इंडेक्स ८.२ टक्क्यांनी कोसळला, जी एप्रिल २०२५ नंतरची सर्वात मोठी साप्ताहिक घसरण मानली जात आहे.
गेल्या महिन्यात 'एन्थ्रोपिक' या टेक स्टार्टअप कंपनीने लाँच केलेल्या एआय (AI) टूलमुळे जागतिक तंत्रज्ञान जगतात मोठी खळबळ उडाली असून, बाजारातील या मंदीमागे हेच मुख्य कारण असल्याचं मानलं जात आहे. ही नवीन तंत्रज्ञान प्रणाली भारताच्या २८३ अब्ज डॉलरच्या आयटी सर्व्हिस उद्योगासाठी मोठा धोका असून, यामुळे कंपन्यांच्या पारंपारिक बिझनेस मॉडेलचं नुकसान होऊ शकतं, अशी भीती गुंतवणूकदारांमध्ये आहे. जनरेटिव्ह एआयच्या वाढत्या वापरामुळे कोडिंग आणि टेस्टिंग सारख्या मूलभूत कामांचं ऑटोमेशन होईल, असं विश्लेषकांचं मत आहे.
Anthropic ची सर्वत्र चर्चा; कोण आहेत कंपनीत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे राहुल पाटील?
जेपी मॉर्गनचा इशारा
शुक्रवारच्या व्यापारी सत्रात आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे शेअर्स २.१ टक्क्यांनी घसरले, तर इन्फोसिसमध्ये १.२ टक्के आणि एचसीएल टेकच्या शेअर्समध्ये १.४ टक्क्यांची घट नोंदवली गेली. एका वेळी आयटी इंडेक्स ५.२ टक्क्यांपर्यंत खाली गेला होता, परंतु सत्राच्या शेवटच्या तासांत झालेल्या रिकव्हरीमुळे ही घसरण काही प्रमाणात सावरली.
जेपी मॉर्गन या दिग्गज वित्तीय संस्थेच्या विश्लेषकांनी त्यांच्या अहवालात इशारा दिला आहे की, जागतिक ग्राहक आता त्यांच्या आयटी बजेटचं पुनर्वितरण करू शकतात. ग्राहकांचं लक्ष आता पारंपारिक सॉफ्टवेअर सेवांवरून एआय-आधारित उपायांकडे वळत असल्यानं भारतीय कंपन्यांच्या विकास लक्ष्यांवर परिणाम होऊ शकतो.
गुंतवणुकीची संधी
हेंडरसन फार ईस्ट इनकमचे पोर्टफोलिओ मॅनेजर सॅट दुहरा यांच्या मते, भारतीय आयटी कंपन्या एआयला धोक्याऐवजी संधीत कसे बदलतील, हे स्पष्ट करण्यात अपयशी ठरल्या आहेत. स्पष्ट रणनीती आणि आराखड्याच्या अभावामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झालाय. दरम्यान, सेंटरम ब्रोकिंगचे पियुष पांडे यांच्या मते, शुक्रवारी दुपारनंतर आलेल्या रिकव्हरीचं मुख्य कारण म्हणजे 'डिपमध्ये खरेदी' (Buying the dip) करणं हे होतं. या मोठ्या घसरणीनंतर अनेक गुंतवणूकदारांना या शेअर्सचे मूल्य आकर्षक वाटू लागलंय. काही बाजार विश्लेषकांचं असंही मत आहे की, एआयमुळे निर्माण झालेल्या धोक्यांवर बाजारपेठेनं गरजेपेक्षा जास्त आणि खूप लवकर प्रतिक्रिया दिली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
