Tel Aviv Stock Market Up : इस्रायल आणि इराणमधील युद्ध आता वेगळ्या वळणावर आलंय. इस्रायलच्या हल्ल्यानंतरच्या सात दिवसांत अनेक इराणी अणुशास्त्रज्ञ आणि लष्करी कर्मचारी मारले गेले आहेत. दरम्यान, इराणनंही शक्तिशाली क्षेपणास्त्र हल्ल्याचा बदला घेतला. गुरुवारी, इराणनं डागलेले क्षेपणास्त्र दक्षिण इस्रायलमधील सर्वात मोठं रुग्णालय असलेल्या सोरोका मेडिकल सेंटरवर पडलं आणि त्याचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इराणनं केलेल्या या क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान ४७ लोक जखमी झाले. दुसरीकडे, अमेरिकेनंही या युद्धात उडी घेण्याचे संकेत दिले आहेत.
इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट
एवढंच नाही तर गुरुवारी इराणनं इस्रायलच्या स्टॉक एक्स्चेंजवर हल्ला केला. अल जझीरानेही इस्रायलच्या तेल अवीव स्टॉक एक्स्चेंजवर झालेल्या हल्ल्याची पुष्टी केली आहे आणि त्यात किती नुकसान झालं हेदेखील सांगितलं. हल्ल्यामुळे संपूर्ण शहरात गोंधळ उडाला होता.
भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
परंतु, गुरुवारी सकाळी झालेल्या हल्ल्यानंतरही इस्रायलचा शेअर बाजार प्रचंड वेगाने व्यवहार करताना दिसला. शेअर बाजार केवळ मजबूत राहिला नाही तर ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला. TASE चा ऑल शेअर इंडेक्स २५७४.८९ च्या पातळीवर ०.५% वाढीसह बंद झाला, जो ५२ आठवड्यांतील सर्वोच्च पातळी आहे. याशिवाय, TA देखील ४ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत २,८१०.८५ वर बंद झाला.
गुंतवणूकदारांचा भरवसा कायम
गेल्या आठवड्यात, टीएच्या शेअरमध्ये ५% ची वाढ झाली. एप्रिलमध्ये त्यात ४.५३ टक्के आणि मेमध्ये ६.५५ टक्के वाढ झाली. म्हणजेच, इराणी क्षेपणास्त्राच्या भीतीऐवजी, गुंतवणूकदारांनी इस्रायलवर अधिक विश्वास ठेवला आणि त्यात पैसे गुंतवले. खरं तर, इस्रायलचा शेअर बाजार कमकुवत न होण्याची अनेक कारणे आहेत, जसं की युद्धाच्या वेळी संरक्षण कंपन्यांची मागणी वाढते. अशा अनेक इस्रायली कंपन्या संरक्षण तंत्रज्ञान, राफेल शस्त्रे आणि एल्बिट प्रणाली बनवण्यात खूप पुढे आहेत. अशा परिस्थितीत, या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सतत गुंतवणूक केल्याने शेअर बाजार मजबूत राहिला.
याशिवाय, तेथील सायबर सुरक्षा आणि तंत्रज्ञान उद्योगानेही गुंतवणूकदारांना आकर्षित केलं आहे. युद्धादरम्यान आर्थिक स्थिती चांगली राखण्यासाठी इस्रायली सरकार आणि त्याच्या मध्यवर्ती बँकेनं अनेक पावले उचलली आहेत.