Stock Market Latest News: ऑक्टोबरपासून शेअर बाजार सातत्यानं निराशाजनक दिसून येत आहे. कोरोना महासाथीनंतर पहिल्यांदाच शेअर बाजाराला सातत्यानं इतका मोठा फटका बसताना दिसतोय. कोरोनामुळे झालेली घसरण वगळली तर गेल्या १० वर्षांतील दुसरी सर्वात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. कमकुवत जागतिक ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर आयटी तसंच ऑईल अँड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री झाल्यानं सोमवारी प्रमुख शेअर निर्देशांक बीएसई सेन्सेक्स ८२४ अंकांनी घसरून सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६ जून २०२०४ नंतर पहिल्यांदाच २६३.०५ अंकांनी घसरून २३ हजार अंकांच्या खाली घसरला. दरम्यान, रिच डॅड पुअर डॅड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी शेअर बाजाराविषयी एक भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. फेब्रुवारीमध्ये शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण पाहायला मिळणार असल्याचं ते म्हणतात. मात्र, मंगळवारी शेअर बाजार थोडा सावरताना दिसतोय. सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला, पण ही अस्थिरता पाहता गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत किरकोळ गुंतवणूकदारांनी पुढे कोणती रणनीती अवलंबावी? मार्केट एक्स्पर्ट काय म्हणतात, जाणून घेऊया.
काय म्हणाले एक्सपर्ट?
ऑक्टोबरपासून शेअर बाजार सातत्यानं निगेटिव्ह झोनमध्ये आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच बाजारात एवढी घसरण पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील घसरण आणखी वाढू शकते. बाजारात चढ-उतार सुरूच राहू शकतात. थोडीशी खरेदी दिसली तरी घसरणीचा हा ट्रेंड यापुढेही कायम राहू शकतो. दरम्यान, गुंतवणूकदारांचे संपूर्ण लक्ष सध्या आगामी अर्थसंकल्पाकडे लागलं आहे, अशी प्रतिक्रिया रेलिगेअर ब्रोकिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी लाईव्ह हिंदुस्तानशी बोलताना दिली.
दीर्घकालीन भांडवली नफ्याबाबत अर्थसंकल्पात काही सकारात्मक निर्णय झाले किंवा काही सकारात्मक संकेत मिळाले तर बाजार काही सावरू शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) बँकिंग व्यवस्थेत तरलता वाढविण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्यानंतर बाजारात सकारात्मक परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे आणखी सकारात्मक घोषणा झाल्यास बाजारात तेजी येऊ शकते, असंही ते म्हणाले.
रिटेल गुंतवणूकदारांनी काय करावं?
गेल्या चार-पाच वर्षांत ज्यांनी बाजारात एन्ट्री घेतली आहे, त्यांनी या वेळी समंजसपणे गुंतवणूक करावी. किरकोळ गुंतवणुकदारांनी या वेळी फक्त त्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे ज्यांचे फंडामेंटल मजबूत आहेत आणि कंपनी नफ्यात आहे. त्याचबरोबर ज्या कंपनीबद्दल त्यांना फारशी माहिती नाही, अशा कंपनीत गुंतवणूक करणं टाळावं. असं ते रिटेल गुंतवणूकदारांबाबत म्हणाले.
मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये विक्रीचा दबाव आहे आणि ही आणखी दिसून येऊ शकते. अशा वेळी विशिष्ट आव्हाने असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणं टाळलेलेच बरं, असंही त्यांनी नमूद केलं.
स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्स टाळा!
डीपसेकचा अमेरिकन शेअर बाजारावर आणि विशेषत: टेक शेअर्सवर परिणाम होतो. मध्यम कालावधीत त्याचा जागतिक स्तरावरील बाजारांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारपेठेत बरीच विक्री झाली असून तेजीसाठी तो सज्ज आहे. रिझर्व्ह बँकेनं बँकिंग व्यवस्थेत सुमारे दीड लाख कोटी रुपयांची तरलता वाढविण्याच्या उपाययोजनांची केलेली घोषणा बाजारासाठी सकारात्मक आहे, अशी प्रतिक्रिया जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट डॉ. व्ही. के. विजयकुमार यांनी दिली.
यामुळे फेब्रुवारीच्या धोरण बैठकीत एमपीसीकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता वाढली आहे. बँकांना फायदा होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदार या संधीचा उपयोग मूलभूतदृष्ट्या मजबूत उच्च-गुणवत्तेचे शेअर्स खरेदी करण्यासाठी करू शकतात. मिडकॅप आणि स्मॉलकॅपपेक्षा लार्जकॅप शेअर्सवरमध्ये गुंतवणूक करणं योग्य ठरू शकतं, असंही ते म्हणाले.
(टीप - यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)