Ireda Share Price : इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या (IREDA) शेअरमध्ये बुधवारी, १ जानेवारी २०२५ रोजी बंपर वाढ झाली. कंपनीच्या शेअर्समध्ये आज ६ टक्क्यांची वाढ दिसून आली, त्यानंतर कंपनीचा शेअर २२७.७० वर पोहोचला. वास्तविक, नवरत्न पीएसयू आयआरईडीएनं आपल्या तिसऱ्या तिमाहीच्या बिझनेस अपडेटमध्ये डिसेंबर तिमाहीत कर्जाचं वितरण वार्षिक आधारावर ४१ टक्क्यांनी वाढलं असून ते १७,२३६ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
इरेडाने दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या तिमाहीत कर्ज मंजुरीत १२९ टक्क्यांनी वाढ झाली असून ती ३१,०८७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्याचवेळी कंपनीचं आऊटस्टँडिंग लोन बुक आता ६९,००० कोटी रुपयांवर पोहोचलंय, जे वार्षिक आधारावर ३६ टक्क्यांची वाढ दर्शवते.
वर्षभरात मल्टीबॅगर रिटर्न
नोव्हेंबर २०२३ मध्ये लिस्ट झालेल्या इरेडाच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात जबरदस्त कामगिरी केली आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सनं ११३ टक्के मल्टीबॅगर परतावा दिलाय. मात्र, गेल्या तीन महिन्यांत हा शेअर जवळपास ३ टक्क्यांनी घसरला असून ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून तो २८ टक्क्यांनी घसरला.
सप्टेंबर तिमाही निकाल काय?
आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत इरेडाचा निव्वळ नफा ३८८ कोटी रुपये झाला, जो गेल्या वर्षी याच कालावधीत २८५ कोटी रुपये होता. त्याचवेळी कामकाजातून मिळणारं उत्पन्न १,६२९ कोटी रुपये झालं असून, त्यात ३८ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. तिमाही आधारावर दुसऱ्या तिमाहीचा पीएटी ३८४ कोटी रुपयांवरून १ टक्क्यांनी वाढला, तर महसुलात ८ टक्क्यांनी वाढ झाली. इरेडा ही नवरत्न कंपनी आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)