मुंबई : भारतातील शेअर बाजारामध्ये मंदी असल्याने अनेक कंपन्यांनी १.१ ट्रिलिअन रुपयांचे आपले आयपीओ बाजारात आणलेलेच नाहीत. यापैकी काही आयपीओसाठी असलेली मुदत संपून जाण्याचा धोका आहे. मात्र, मंदीच्या काळात आयपीओ आणण्यापेक्षा नव्यानं प्रस्ताव दाखल करण्याला कंपन्या प्राधान्य देत आहेत.
वर्षभरापूर्वी विक्रमांमागून विक्रम नोंदवत असलेल्या शेअर बाजाराला गेल्या सहा-सात महिन्यांपासून उतरती कळा लाागलेली दिसत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या आयपीओसाठी प्रस्ताव टाकूनही तो बाजारात आणलेला नाही. या सर्व प्रस्तावांचे मूल्य १ ट्रिलिअन रुपये आहे.
दुय्यम बाजार तेजीमध्ये असताना अनेक कंपन्या आपले आयपीओ आणून भांडवल उभारणी करत असतात. त्यासाठी प्रस्ताव देऊन त्याला मंजुरी घेणं आवश्यक असतं. प्रस्ताव मंजूर झाला, म्हणजे आयपीओ बाजारात येतोच असं नाही. यासाठी ठराविक मुदत असते, त्यामध्ये हा आयपीओ बाजारात आणावा लागतो, अन्यथा ही मुदत संपते.
ज्या वेळी बाजार चढता असतो, त्यावेळी प्रस्ताव मंजूर झाला, पण नंतर बाजार घसरायला लागला तर अनेकदा कंपन्या आयपीओ आणत नाहीत. घसरत्या बाजारात आयपीओ आणण्यापेक्षा काही कंपन्या नव्यानं परवानगी घेतात. मागील वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून चालू वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत २०४ कंपन्यांच्या आयपीओला परवानगी आहे. त्यामध्ये सुमारे १.१ ट्रिलिअन रुपयांचे आयपीओ आहेत. मात्र, बाजार खाली असल्यानं अनेक कंपन्यांनी ते आणलेले नाहीत.