Share Market Loss: देशांतर्गत बाजाराच्या सद्यस्थितीमुळे गुंतवणूकदारांच्या समस्येत वाढ होताना दिसत आहे. सलग आठ सत्रात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं २५.३१ लाख कोटी रुपयांचे नुकसान झालंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे बाजार बुडाला आहे. भांडवलाचा ओघ, अपेक्षेपेक्षा कमकुवत तिमाही निकाल आणि जागतिक व्यापार युद्धाची अनिश्चितता यामुळे परदेशी गुंतवणूकदार तणावात आहेत. बीएसई सेन्सेक्समध्ये आठ ट्रेडिंग सेशनमध्ये २,६४४.६ अंकांची म्हणजेच ३.३६ टक्क्यांची घसरण झालीये. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८१० अंकांनी म्हणजेच ३.४१ टक्क्यांनी आपटलाय. मात्र, भविष्याबाबत बाजारात संमिश्र कल दिसून येऊ शकतात असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय.
शुक्रवारी बाजारातील व्यवहाराची सुरुवात सकारात्मक तेजीसह झाली. पण, सुरुवातीची तेजी नंतर संपली. व्यवहाराअंती सेन्सेक्स १९९.७६ अंकांनी घसरून ७५,९३९.२१ वर बंद झाला. व्यवहारादरम्यान तो ६९९.३३ अंकांच्या नीचांकी पातळीवर घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०२.१५ अंकांनी घसरून २२,९२९.२५ वर बंद झाला.
शेअर बाजारातील घसरणीमुळे बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचं बाजार भांडवल आठ दिवसांत २५,३१,५७९.११ कोटी रुपयांनी घसरून ४,००,१९,२४७ कोटी रुपयांवर (४,६१० अब्ज डॉलर) आले.
पुढे काय?
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे रिसर्च हेड विनोद नायर यांच्या म्हणण्यानुसार कमकुवत तिमाही निकाल, रुपयाचं अवमूल्यन आणि टॅरिफसारख्या बाह्य घटकांमुळे नजीकच्या काळात बाजाराची धारणा कमकुवत राहण्याची शक्यता आहे. एफआयआयचा विक्रीचा ओघ सुरू राहिल्यानं ही घसरण आणखी वाढू शकते. नायर यांच्या मते, दरांबाबत स्पष्टता येईपर्यंत आणि कॉर्पोरेट उत्पन्नात सुधारणा होईपर्यंत अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे, भारतीय शेअर बाजारातील तीव्र घसरणीमुळे गेल्या दोन आठवड्यांतील तेजी पूर्णपणे धुसर झाली आहे. या आठवड्यात सलग आठ सत्रात विक्रीची चिंता गुंतवणूकदारांना सतावत असल्याची प्रतिक्रिया एंजेल वनचे वरिष्ठ विश्लेषक ओशो कृष्णन यांनी दिली.
स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांना अधिक फटका
बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक ३.२४ टक्के आणि मिडकॅप निर्देशांक २.५९ टक्क्यांनी घसरला. बीएसईचे क्षेत्रवार निर्देशांक ३.१६ टक्के, सेवा ३.१६ टक्के, औद्योगिक ३.०३ टक्के, भांडवली वस्तू २.७६ टक्के, वीज २.६५ टक्के, युटिलिटी २.५२ टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू २.३९ टक्क्यांनी घसरले. त्याचप्रमाणे कमॉडिटी आणि रियल्टी मध्ये अनुक्रमे २.२५ टक्के आणि २.०३ टक्के घसरण झाली. या काळात केवळ आयटी क्षेत्रच नफ्यात होते.