Market Highlights : सकाळच्या सत्रात मिळालेली मोठी आघाडी शेवटच्या तासांतील विक्रीच्या दबावामुळे शेअर बाजाराने गमावली. बुधवारी भारतीय शेअर बाजार एका मर्यादित कक्षेत व्यवहार करत अखेर किरकोळ वाढीसह 'फ्लॅट' स्तरावर बंद झाला. सेन्सेक्समध्ये ४५ अंकांची, तर निफ्टीमध्ये ५० अंकांची वाढ नोंदवण्यात आली. मात्र, या किरकोळ वाढीमुळेही गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.
निर्देशांकांची दिवसभरातील स्थिती
सेंसेक्स : सकाळी ८२,५३० च्या पातळीवर उघडलेला सेन्सेक्स दिवसाच्या अखेरीस ०.०६ टक्क्यांच्या वाढीसह ८२,२७६ वर स्थिरावला.
निफ्टी ५० : निफ्टीने २५,५१२ वर ओपनिंग दिली होती, पण बाजार बंद होताना तो ०.२३ टक्क्यांच्या वाढीसह २५,४८२ वर बंद झाला.
मार्केट कॅप: बीएसई वरील सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४६५.६ लाख कोटींवरून वाढून ४६७ लाख कोटींच्या पार गेले आहे.
मेटल्स आणि फार्मा चमकले
आजच्या सत्रात निफ्टी मेटल इंडेक्समध्ये सर्वाधिक २.७०% ची वाढ झाली. त्याखालोखाल फार्मा (१.८५%) आणि ऑटो (१.८५%) क्षेत्रातील शेअर्सनी चांगली कामगिरी केली. आयटी क्षेत्रातील पुनरागमन सुरूच असून हा निर्देशांक १.५७% ने वधारला. दुसरीकडे, पीएसयू बँक, इन्फ्रा, एफएमसीजी आणि रिअल्टी या क्षेत्रांत मात्र घसरण पाहायला मिळाली.
टॉप गेनर्स आणि लूजर्स
| निफ्टी ५० - टॉप गेनर्स | वाढ (%) | निफ्टी ५० - टॉप लूजर्स | घसरण (%) |
| HCL टेक | +२.९२% | रिलायन्स इंडस्ट्रिज | -२.१३% |
| बजाज ऑटो | +२.७३% | एसबीआय | -१.९०% |
| टाटा स्टील | +२.६४% | क्वालिटी वॉल्स | -१.८०% |
| श्रीराम फायनान्स | +२.२८% | अदानी पोर्ट्स | -१.७२% |
| अदानी एंटरप्रायझेस | +२.२४% | इटरनल | -१.५०% |
बाजाराचा कल
सुरुवातीला जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी झाली. मात्र, रिलायन्स आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांसारख्या दिग्गज शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजाराला वरच्या स्तरावर टिकून राहता आले नाही. रिलायन्समध्ये २.१३% ची घसरण झाल्याने निफ्टीवर दबाव निर्माण झाला.
वाचा - आयटी क्षेत्राचे 'कमबॅक'! 'अँथ्रोपिक'च्या एका निर्णयाने फिरले चक्र; टीसीएस-इन्फोसिसच्या शेअर्समध्ये ५% वाढ
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
