Integrated Industries :शेअर बाजारात 'छोटा पॅक बडा धमका' करणाऱ्या स्टॉक्सची कायम चर्चा असते. असा एखादा शेअर आपल्याही पोर्टफोलिओमध्ये यावा असं अनेकांना वाटत असतं. अशाच एका छोटू शेअरने सध्या मार्केट गाजवलं आहे. एफएमसीजी क्षेत्रातील स्मॉलकॅप कंपनी असलेल्या इंटीग्रेटेड इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सोमवारी जोरदार वाढ झाली. कंपनीचा शेअर ९% वाढीसह २०.३८ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तोंडावर या पेनी स्टॉकने ही मोठी झेप घेतली आहे. इंटीग्रेटेड इंडस्ट्रीजने १८ सप्टेंबर २०२५ रोजी वार्षिक सभेचे आयोजन केले असून, त्यात अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांवर विचार केला जाणार आहे. त्यामुळे आज या शेअरची मागणी वाढल्याचे दिसून आले.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार बैठक
गेल्या महिन्यात कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, त्यांची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दुपारी १ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या सभेत आर्थिक वर्ष २०२४-२५ चा वार्षिक अहवाल सादर केला जाईल. या सभेसाठी ई-व्होटिंगची मुदत आज, १५ सप्टेंबर सकाळी ९ वाजल्यापासून १७ सप्टेंबर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खुली असेल.
५ वर्षांत ६६,०००% चा बंपर परतावा
गेल्या एका वर्षाच्या काळात या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना निराश केले आहे. ६ महिन्यांत १८%, तर एका वर्षाच्या कालावधीत ५०% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. मात्र, दीर्घकाळात या शेअरने दमदार कामगिरी दाखवली आहे. गेल्या पाच वर्षांत इंटीग्रेटेड इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी ६६,०००% चा विक्रमी परतावा दिला आहे, ज्यामुळे कंपनीच्या वाढीची क्षमता दिसून येते.
वाचा - भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
पहिली तिमाहीचे निकालही शानदार
आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीने मजबूत आर्थिक निकाल सादर केले आहेत. जून २०२५ मध्ये कंपनीची निव्वळ विक्री ७८.२९% वाढून २४९.८५ कोटींवर पोहोचली, जी गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक विक्री आहे. तसेच, ऑपरेटिंग प्रॉफिटमध्येही वाढ होऊन तो २५.५१ कोटी रुपये झाला. करानंतरचा नफा (PAT) ५१.७% वाढून १९.६९ कोटी रुपये झाला असून, प्रति शेअर कमाई ०.८४ रुपये नोंदवली गेली. कंपनीच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे शेअरमध्ये तेजी आल्याचे मानले जात आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)